राज्य हज कमिटीचे सदस्य बबलु शेख यांचे, सीईओ लियाकत अफाकी यांच्यावर आरोप
ठाणे : भारतातुन सौदी अरेबिया येथे हज यात्रेसाठी गेलेल्या भाविकांचे तेथे हाल सुरु आहेत. यात्रेकरूंना भोजन, प्रवासाची आणि निवासाचीही व्यवस्था नसुन याला हज कमिटीचे सीईओ लियाकत अफाकी हेच जबाबदार आहेत. असा आरोप राज्य हज कमिटीचे सदस्य बबलु शेख यांनी केला आहे. प्रत्येक यात्रेकरूकडुन साडेतीन लाख रुपये घेऊनसुद्धा काहीही सुविधा दिलेल्या नसल्याने हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचेही बबलु शेख यांनी म्हटले आहे. शनिवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बबलु शेख यांनी हज यात्रेकरूंच्या हालअपेष्टांचे व्हीडीओ माध्यमांसमोर दाखवले.
बकरी ईदच्या दरम्यान हज यात्रा संपन्न होत असते. आयुष्यात प्रत्येक मुस्लिम बांधवांची एक वेळेस तरी हज यात्रा करण्याची इच्छा असते. त्यानिमित्ताने देशभरातून सुमारे दीड ते पावणेदोन लाख भाविक जात असतात. १५ ते १६ जून आणि नंतर दोन दिवस सौदी येथे हज यात्रा संपन्न होत आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रसह इतर राज्यांतील भाविकांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील २१ हजार भाविक यात्रेस गेले आहेत. मात्र, सौदी अरेबियामध्ये भाविकांना हज यात्रेसाठी कुठलीच सुविधा नाही. वाहनाची, भोजनाची आणि निवासाचीही व्यवस्था नसल्याने हज यात्रेकरूचे हाल सुरु आहेत. २१ हजार लोकांसाठी केवळ ९० जणांचे पथक व्यवस्थेसाठी तैनात ठेवले आहे. हज यात्रेकरूंच्या दुर्दैवी हालाच्या सौदी अरेबिया येथुन पाठवलेल्या चित्रफिती दाखवुन राज्य हज कमिटीचे सदस्य बबलु शेख यांनी हज कमिटीचे सीईओ लियाकत अफाकी हेच याला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. यात्रेकरूंनी तसेच हज कमिटीच्या सदस्यांनी फोन केल्यानंतर फोनही उचलत नाहीत. लियाकत अफाकी यांनी सर्व कारभार आपल्याच हाती ठेवला असुन लाखो रुपये उकळुनही सुविधा न दिल्याने हा एक प्रकारे सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप बबलु शेख यांनी केला आहे. तेव्हा,केंद्र सरकारने याची दखल घेऊन त्वरीत कारवाई करावी. अशी मागणी बबलु शेख यांनी केली आहे.
