विनय हर्डीकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन
प्रज्ञा जांभेकर
मुंबई : शिक्षक-प्राध्यापक, लेखक-समीक्षक, पत्रकार-संपादक, राजकीय-सामाजिक कार्यकर्ता अशी बहुआयामी ओळख असलेले विनय हर्डीकर 24 जून 2024 रोजी वयाची 75 वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्ताने येत्या 23 व 24 जून रोजी आणि आगामी वर्षभरात विविध कार्यक्रम व उपक्रम होणार आहेत. स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या पहिल्या पिढीचे ते प्रतिनिधी आहेत.
दि. 23 जून रोजी सायंकाळी 6 वाजता संगीत मैफल आयोजित केली आहे. हा कार्यक्रम गणेश सभागृह , न्यू इंग्लिश स्कूल , टिळक रोड, पुणे येथे होणार आहे.
त्यात सुरुवातीला समीर दुबळे यांचे गायन होणार असून, त्यांना पं. रामदास पळसुले तबला साथ करणार आहेत. त्यानंतर पद्मश्री पं. उल्हास कशाळकर यांचे गायन होणार असून, त्यांना तालयोगी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर तबला साथ करणार आहेत. दोन्ही कलाकारांबरोबर श्रीमती अदिती गराडे संवादिनी साथ करणार आहेत.
दि. 24 जून रोजी, सायंकाळी 6 वाजता, विनय हर्डीकर लिखित “एक्स्प्रेस पुराण : माझी पाच वर्षातील शोध पत्रकारिता” या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. हर्डीकर यांनी 1981 ते 86 या पाच वर्षांत इंडियन एक्स्प्रेस मध्ये फिरते प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रात व अन्य राज्यांत जे काम केले त्याचे कथन या पुस्तकात केलेले आहे. साधना प्रकाशन पुणे यांच्याकडून हे पुस्तक प्रकाशित होत आहे. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम श्रमिक पत्रकार भवन चे सभागृह, नवी पेठ, पुणे येथे होणार आहे. या वेळी ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे व ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस हे दोघे हर्डीकर यांची मुलाखत घेणार आहेत.
आगामी वर्षभरात आणखी चार विशेष महत्वाचे कार्यक्रम उपक्रम होणार
- विनय हर्डीकर यांनी नोव्हेंबर डिसेंबर 2021 मध्ये कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात मराठी संशोधक विद्यार्थ्यांसाठी दहा दिवसाची कार्यशाळा घेतली होती. जागतिक आणि मराठी कादंबरीवर हर्डीकर यांचे बीजभाषण आणि विद्यार्थ्यानी निरनिराळ्या कादंबऱ्यावर केलेली भाषणे आणि त्यावर हर्डीकर यांची टीका टिप्पणी अशी ती कार्यशाळा होती. त्या कार्य शाळेवर आधारित पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. त्या पुस्तकाचे संपादन सुनीलकुमार लवटे हे करीत आहेत. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ कोल्हापूर येथे होणार आहे.
- मराठी साहित्य समीक्षा या विषयावरील कार्यशाळा, सातारा येथे होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा शाखेचे प्रमुख शिरीष चिटणीस हे या कार्यशाळेचे संयोजन करीत आहेत.
- स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या पहिल्या पिढीतील वीस ते पंचवीस मान्यवर व्यक्तींचे लेख असलेल्या एका ग्रंथाचे प्रकाशनही आगामी वर्षभरात होणार आहे. राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती, प्रशासन , शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांतील ( राज्य स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर विशेष योगदान देणाऱ्या ) व्यक्ती या ग्रंथात त्यांच्या स्वत:च्या वाटचालीवर आणि त्यांच्या कार्यक्षेत्रावर दृष्टीक्षेप टाकणारे लेख लिहिणार आहेत. अभय बंग, राजन गवस, सतीश आळेकर, गणेश देवी, मुंबईच्या रसायन तंत्र संस्थेचे कुलगुरू डॉक्टर अनिरुद्ध पंडित, उद्योगपती प्रमोद चौधरी, गायक सत्यशील देशपांडे इत्यादी मान्यवरांचा त्यात समावेश आहे.
- विनय हर्डीकर यांनी ज्या ज्या ज्या क्षेत्रात काम केले, त्या त्या क्षेत्रातील तज्ञांच्या पॅनेलने त्यांची मुलाखत घ्यायची आणि त्याचे Video Recording करून U-Tube वर त्या मुलाखती प्रक्षेपित करायच्या असाही एक उपक्रम आगामी वर्षभरात होणार आहे. Political Economy, Radical Liberalism, साहित्य/कविता : मराठी, इंग्लिश व संस्कृत, ट्रेकिंग भटकंती , संगीत इत्यादी क्षेत्रांचा त्यात समावेश आहे.
वरील सर्व कार्यक्रम व उपक्रम विनय हर्डीकर अमृतमहोत्सव समितीच्या वतीने आयोजित केले जाणार आहेत. या समितीमध्ये राम कोल्हटकर, राजीव बसर्गेकर, शिरीष चिटणीस, विनोद शिरसाठ, रविमुकुल, हेमंत साठ्ये, रमेश जाधव, मोहन गुजराथी, अनंत अभंग, समीर दुबळे या दहा सदस्यांचा समावेश आहे.