देशात लोकसभा निवडणुका जाहीर होईपर्यंत सर्वच विरोधी पक्ष हे येत्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष ईव्हीएम मशीन हॅक करून घोटाळा करणार असा आरोप करीत होते. निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्यावेळी भारतीय जनता पक्षाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सहाजिकच देशातील विरोधी पक्ष कुठेतरी सुखावले आणि भारतीय जनता पक्षाचा नैतिक पराभव झाला आहे अशी ओरड करू लागले. ही ओरड सुरू असताना ईव्हीएम घोटाळा झाला असावा हा मुद्दा ते पुरते विसरून गेले होते.
मात्र तीन दिवसांपूर्वी काही संबंधितांनी काँग्रेसच्या विजयी झालेल्या ९९ उमेदवारांच्या निवडीवर आक्षेप घेत या निवडी रद्द कराव्या अशा आशयाची मागणी केली गेली .तेव्हापासून पुन्हा एकदा ईव्हीएम मशीन ऐरणीवर आलेली दिसते आहे. त्यातच महाराष्ट्रातील एका मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वाउफक्त ४८ मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे हा निकाल समोर ठेवत विरोधी पक्ष नेते पुन्हा एकदा ईव्हीएम घोटाळ्याच्या नावाने कंठशोष करू लागले आहेत.
भरीस भर काल काल मुंबईतील एका वृत्तपत्रांनीही या ईव्हीएम घोटाळ्याबाबत काहीतरी बातमी छापली. ती बातमी चुकीची आहे म्हणून त्यांनी आज प्रकाशित झालेल्या आपल्या अंकात वाचकांची माफी देखील मागितली आहे. मात्र काल ती बातमी प्रकाशित होताच देशभरातील विरोधी पक्ष खडबडून जागे झाले आणि त्यांनी ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून हॅक केली आहे, असा आरोप करणे सुरू केले. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी तर असा दावा केला आहे की निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदानामध्ये भाजपने हेराफेरी केली असावी. म्हणून त्यांना २४० जागा तरी मिळाल्या. जर निवडणूक आयोग त्यांच्या हातात नसता तर भाजपाला चाळीस जागाही मिळणे कठीण होते असा जावई शोध आदित्य ठाकरेंनी लावला आहे.
यात भरीस भर म्हणजे अमेरिकेतील ख्यातनाम उद्योगपती आणि टेस्ला मोटर्स चे मालक एलन मस्क यांनी ईव्हीएम मशीन हॅक केली जाऊ शकते असा दावा केल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रकाशित केले आहे. हे वृत्त प्रकाशित होताच देशभरातील विरोधी पक्षांचे नेते पुन्हा एकदा एलन मस्क यांची साक्ष काढत भाजपने ईव्हीएम हॅक करूनच हा विजय मिळवला अशी तक्रार करताना दिसत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तर ईव्हीएम मशीनला ब्लॅक बॉक्स म्हणत टीका केली आहे.
मात्र निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन हॅक केली जाऊ शकते हा दावा स्पष्ट शब्दात फेटाळला आहे. माजी तंत्रज्ञान मंत्री चंद्रशेखर यांनी देखील हा दावा फेटाळत आपण या विषयावर एल अँड मस्त एलन मस्क यांची शिकवणी घ्यायला तयार आहोत असेही आवाहन केले आहे. एकूणच हा वाद चांगलाच चिघळताना दिसतो आहे.
मुळात प्रश्न असा निर्माण होतो की एलन मस्क हे खरोखरी संगणक तज्ञ किंवा माहिती तंत्रज्ञान तज्ञ आहेत का? आमच्या माहितीनुसार ते ऑटोमोबाईल क्षेत्रातील जाणकार आहेत. ते एका कारनिर्मिती करणाऱ्या कंपनीचे मालक आहेत. त्यामुळे ईव्हीएम मशीन निर्मिती किंवा त्याचे तंत्रज्ञान यांच्याशी त्यांचा काही संबंध असेल असे वाटत तर नाही. तसे पुरावेही कुठे उपलब्ध नाहीत. तरीही विरोधी पक्षातील राहुल गांधींपासून तर जितेंद्र आव्हाडांपर्यंत प्रत्येकच जण एलन मस्क सांगतोय आणि तुम्ही नाही म्हणताय म्हणजे काहीतरी गंभीर गुन्हा करत आहात अशा थाटात माध्यमांशी बोलताना दिसले.
वस्तुतः एलन मस्का ईव्हीएम मशीन किंवा मग भारतातील लोकसभा निवडणूक यांच्याशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. तरीही त्याने या प्रकरणात बोलावे आणि त्याचा आधार घेऊन विरोधकांनी भाजपच्या विरोधात गोंधळ करावा हे कोणालाच पटणारे नाही. भारतात मोदींचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत येऊ नये यासाठी परकीय शक्तींचा हस्तक्षेप होत होता असा आरोप केला जातो.
हा प्रकार बघता अशा आरोपात तथ्य तर नाही ना असे क्षणभर वाटून जाते.आपल्या देशात ईव्हीएम चा वापर हा २००४ च्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू झाला. तेव्हापासून अनेक निवडणुका झाल्या. मात्र जोवर काँग्रेस पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष विजयी होत होते तोवर ईव्हीएम वर ते कधीच आक्षेप घेत नव्हते. २०१४ मध्ये प्रथमच भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आणि तेव्हापासून काँग्रेस जनांनी ईव्हीएम बद्दल शंका उपस्थित करणे सुरू केले. इथे मुद्दा असा निर्माण होतो की २०१४ मध्ये निवडणुका झाल्या तेव्हा देशात काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते. म्हणजेच निवडणूक आयोगावरही अप्रत्यक्ष कंट्रोल हा काँग्रेस पक्षाचा होता. मग भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाला हाताशी धरून ईव्हीएम मध्ये हॅकिंग कसे करू शकला असेल? मात्र या प्रश्नाचे उत्तर न देता गत दहा वर्षे सातत्याने भाजप ईव्हीएम मशीन हॅक करतो असाच आरोप केला जात आहे. आता उंदराला मांजर साक्ष या न्यायाने या सर्व ईव्हीएम विरोधकांनी एलन मस्क नामक ईव्हीएमशी काहीही संबंध नसलेल्या व्यक्तीची साक्ष काढलेली दिसते आहे.
मुंबईतील रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर या निवडणुकीत आधी नमूद केल्याप्रमाणे रवींद्र वायकर फक्त ४८ मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे तर सर्वच ईव्हीएम विरोधकांना प्रचंड जोर चढला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आम्ही रवींद्र वायकर यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून रोखू असाही इशारा दिला आहे. या प्रकारात शिवसेना ठाकरे गट न्यायालयातही दाद मागणार असे त्यांनी जाहीर केले आहे. एकूणच हा वाद चांगलाच रंगणार असे चित्र दिसते आहे.
आज संपूर्ण जग हे एकविसाव्या शतकात कार्यरत झालेले आहे. संपूर्ण जगात नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करण्याकडे सर्वसामान्यांचा कल दिसतो आहे. अशावेळी नव्या तंत्रज्ञानाला नाकारण्यासाठी काहीतरी निराधार मुद्दे काढून आणि ज्याचा त्या क्षेत्राशी दुरानवयानेही संबंध नाही अशा व्यक्तीची साक्ष काढून जनतेची दिशाभूल करणे ही कुठेतरी चुकीचे आहे असे सांगावेसे वाटते. भारतासारख्या प्रगतिशील देशाला पुढे जाताना इथल्या नागरिकांना असे निरर्थक मुद्दे काढून भ्रमित करणे हे चुकीचे आहे. त्यामुळे ते थांबवले पाहिजे असे इथे सुचवावेसे वाटते. एलन मस्क प्रकरणाचा हाच अन्वयार्थ असू शकतो.
