मुख्यमंत्र्यांचा दावा

 

ठाणे : लोकसभा निवडणुकीत सरकारविरोधात काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्था आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पद्धतशीरपणे खोटे कथानक पसरविले. त्यामुळे नक्षलवाद केवळ गडचिरोलीत नसून शहरी नक्षलवादी काही स्वयंसेवी संस्थांमध्ये शिरले आहेत, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केला. ठाण्यात टीप टॉप प्लाझा येथे कोकण पदवीधर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचाराकरिता आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यात अनेक संस्था चांगले काम करत आहेत. पण, काही संस्था सरकारविरोधात आहेत. अशा संस्था आणि महाविकास आघाडी खोटे कथानक लोकांपर्यत पोहचवण्यात यशस्वी ठरली. यामुळे डोळ्यात अंजन घालण्याची वेळ आता आली आहे. लोकसभा निवडणुकीत चारशेचा आकडा पार होणार म्हणून कार्यकर्ते आरामात राहिले आणि तेच निवडणुकीत आम्हाला भोवले, असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला तडीपार करण्याची गर्जना करणाऱ्यांच कोकणवासीयांनी तडीपार केले, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याना लगावला. लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्हा आणि कोकण विभागात महायुतीला प्रचंड यश मिळाले. येथील सहा पैकी पाच जागा महायुतीने जिंकल्या. भिवंडीची जागा मिळू शकली नसून इथे काय घडले हे सर्वांनाच माहीत आहे. मुंब्रा येथे जे झाले, तेच भिवंडीत झाले, असे फडणवीस म्हणाले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर अभिजीत पानसे यांनी उमेदवारी मागे घेतल्याचे सांगत फडणवीस यांनी त्यांचे आभारही मानले.
शहरी नक्षली असलेल्या संस्थांनी पंतप्रधानांना हटविण्याचा नारा दिला. मात्र विकासाचा अजेंडा घेऊन काम करणारे मोदी पुन्हा पंतप्रधान झाले. त्यामुळे या संस्थांची चिंता आता वाढली आहे. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *