स्वाती घोसाळकर 

मुंबई  राष्ट्रवादी अजित पवार गटात सारखे डावलण्यात येत असल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ बंडाच्या तयारीत असल्याचे विश्वसनीय सुत्र आहे. समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी  समाजाचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करता यावे यासाठी प्रसंगी भाजपाची साथ सोबत घेण्याचा सुध्दा भुजबळांचा विचार असल्याचे समजते.

याचसाठी आज वांद्रे येथील एमईटीत आयोजित समता परिषदेच्या तातडीच्या बैठकीत भुजबळांनी वेगळा निर्णय घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. मागील काही दिवसांपासून पक्षांतर्गत सुरु असलेली गटबाजी, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, इच्छुक असतानाही नाशिक मतदारसंघातून लोकसभेला न मिळालेलं तिकीट, राज्यसभेला डावललं जाणं या मुद्द्यांमुळं भुजबळांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. भुजबळांनी आतातरी ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

भुजबळांनी गेल्या लोकसभेत पक्षांतर्गत गोंधळावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. पक्षात काही मोजकेच जण निर्णय घेत आहेत अशी भावना राष्ट्रवादी अजित पवार गटात बळावली जात आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अजित पवारांना इतरांपासून तोडले असल्याची भावना भुजबळ समर्थकांची आहे. अगदी जागावाटपासूनही त्यांना जाणीवपुर्वक दुर ठेवले गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभुमीवर आज छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समता परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीला समता परिषदेचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. तुम्ही सरकारमध्ये असला तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आक्रमकपणे मुद्दा लावून ठेवावा लागेल. जेणेकरुन मराठा आरक्षण ओबीसीतून दिले गेले नाही पाहिजे. मराठा आरक्षणाचा फटका ओबीसी बसता कामा नये यासाठी आक्रमक भूमीका मांडा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. या बैठकीतून छगन भुजबळांनी  अॅडव्होकेट मंगेश ससाणे आणि लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून संवाद साधला.. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जातनिहाय जनगणनेसाठी पंतप्रधान मोदींकडे मागणी करणार असल्याचं खुद्द छगन भुजबळांनी स्पष्ट केलंय.

भुजबळ नाराज नाहीत : अमोल मिटकरी

छगन भुजबळांच्या नाराजीच्या बातम्या या सोशल मीडियातूनजाणीवपुर्वक पसरवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा तुतारी गट नाही आमच्या पक्षात कोणतीही अंतर्गत गटबाजी, कलह नाही. अशा शब्दात अजित पवार गटाचे  अमोल मिटकरी यांनी भुजबळांच्या नाराजीचे मुद्दे खोडून काढले.

 स्वत: भुजबळ साहेब सुनेत्रा पवारांना राज्यसभेला उमेदवारी देण्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या बैठकीला उपस्थित होते. समता परिषदेचा तो मेळावा होता.  समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही वेगळे आहे. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली असेल, पण भुजबळ नाराज नाहीत. हे स्वत: भुजबळांनी स्पष्ट केले आहे असेही मिटकरी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *