डोंबिवली : डोंबिवलीतील रहिवासी असलेला पुष्कर विनय ब्याडगी या विद्यार्थ्याने तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या राज्यस्तरिय एमएच-सीईटी परीक्षेत १०० टक्के श्रेयांक (पर्सेंटाईल) मिळविला आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातून पुष्करने आपले शिक्षण घेतले आहे. डोंबिवली पश्चिमेतील माॅडेल इंग्लिश स्कूलमधून पुष्करने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. राॅयल ज्युनिअर महाविद्यालयातून त्याने अकरावी, बारावीचे शिक्षण घेतले. अभियांत्रिकीतून पुढील शिक्षण घ्यायचे नक्की असल्याने त्या दिशेने अभ्यास केला. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंंडळाच्या अभ्यासक्रमातील पुस्तकांचे वाचन केले. तसेच एमएच-सीईटीच्या यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला. याशिवाय खासगी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्याने आपणास हे यश मिळाले आहे, असे पुष्करने सांगितले.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या जेईई (मुख्य) परीक्षा आपण दिली होती. या परीक्षेत आपणास ९९.०७ टक्के श्रेयांक (पर्सेंटाईल) मिळाले आहेत. या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर गुणवत्तेच्या यादीत आपण २०८ वे आहोत, असे पुष्करने सांगितले. या गुणांच्या आधारे आपण मुंबई आयआयटीमध्ये इलेक्ट्रिक इंजिनिअर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार आहोत. आपण नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर वाचन केले. खेळामध्ये आपणास बॅडमिंटन आवडते. त्यामुळे त्याचा सराव नियमित करतो. पुष्करचे वडील डोंबिवलीत नेत्ररुग्ण चिकित्सक आहेत. आई गृहिणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *