नाशिक : लोकसभेत दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतरही भाजपाप्रणीत महायुतीतील धुसफूस संपता संपत नाहीय. नाशिक शिक्षक मतदार संघात अजित पवार राष्ट्रवादी गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आमनेसामने उभी ठाकली असल्यामुळे महायुतीम्हणून कुणाचा प्रचार करायचा असा प्रश्न कार्यकर्त्यापासून नेत्यानाहा पडला आहे.
याउलट महाविकास आघाडीतील तिढा सुटलेला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे निवडणूक लढवित असून त्यांना प्रचारात आघाडीही घेतली आहे.
महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अलीकडेच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत किशोर दराडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील, असा निश्चय ठरला होता. मात्र आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार यांच्या प्रचारासाठी बैठकांचा जोर वाढला आहे. त्यामुळे महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांच्या प्रचारासाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण हे मैदानात उतरले आहेत. महेंद्र भावसार यांचा प्रचार आणि नियोजनासाठी सुरज चव्हाण यांनी नाशिकमध्ये बैठक घेतली. महेंद्र भावसार हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत, असे स्पष्टीकरण सुरज चव्हाण यांनी दिले आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नाशिकच्या जागेसाठी चौरंगी लढत होणार असून या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.