भिवंडी : भारताचे ऊर्जा मंत्रालय देशाला ऊर्जेच्या बाबतीत सक्षम बनवण्यासाठी एक निश्चित ध्येय डोळ्यापुढे ठेवून कामास लागले आहे. ऊर्जा मंत्रालयाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून विजेची मागणी आणि विद्यमान पुरवठा यातील तफावत भरून काढण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत. मुंबई महानगर प्रदेशाला साडेचार हजार मेगा वॅट इतका विजेचा तुटवडा भासत आहे. यापैकी २००० मेगा वॅट अतिरिक्त वीज पुरविण्याची जबाबदारी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांना देण्यात आली आहे. काही महिन्यातच हा प्रकल्प पूर्ण होणार असून सध्या भिवंडी तालुक्यात या प्रकल्पाचे कार्य जोमाने प्रगतीपथावर आहे.
सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय प्रगती पोर्टलच्या माध्यमातून सदरच्या प्रकल्पपुरती करता लक्ष ठेवून आहे. प्रकल्पाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय देखील प्रकल्प पूर्णत्वाकरिता युद्ध पातळीवर कार्य करत आहे. तूर्तास भिवंडी तालुक्यातील तीन गावांतून या प्रकल्पाची उच्च वीज वाहिनी जाते. खानिवली, तळवली तर्फे राहुर आणि कांदली तर्फे राहुर अशा तीन गावांतून जाणाऱ्या या वाहिनीची साधारणपणे लांबी ४.३ कि.मी. इतकी आहे. उच्च वीज वाहक तारा वाहून नेणारे टॉवर हे या प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाचे घटक असतात. भिवंडी तालुक्यातील तीन गावांच्या 19 टॉवर उभारण्यात येणार आहेत. यातील जवळपास सर्वच टॉवर उभारणीच्या पाया बांधणीचे कार्य पूर्ण झालेले असून.१४ टॉवर उभारून पूर्ण देखील झालेले आहेत.
या प्रकल्पाकरित या तीन गावांतील ९०५ भूधारकांची जमीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकरता वापरली जाणार आहे. राष्ट्रीयकृत प्रकल्पांकरता जाणाऱ्या जमिनींच्या मोबदल्याचे बाबत २०२२ मधील सुधारित तरतुदींच्या अन्वये भूधारकांना जमीन वापरल्याचा परतावा दिला जाणार आहे. तूर्तास २७७ भूधारकांना परतावा देण्याचे काम पूर्ण झालेले असून उर्वरित भूधारकांना परतावा देण्याचे काम सुरू आहे. एकत्रित मिळून तब्बल २४ कोटीपेक्षा अधिक रुपयांचा परतावा भूधारक लाभार्थींना मिळणार असल्याचे समजते.
गुजरात राज्यामधून येणारी ही वीज मुंबई महानगर प्रदेशात पोहोचविली जाणार आहे.पडघा ते खारघर या टप्प्यात ४०० के व्ही क्षमतेची उच्च वीज वाहक यंत्रणा उभारण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. आगामी काळात विद्युत ऊर्जा हीच ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत राहणार आहे. घरगुती वापरण्याची उपकरणे ते थेट दुचाकी – चार चाकी वाहने हे सारे विजेवरती वापरले जात आहे. अर्थातच यामुळे विजेचा वापर वाढता राहणार आहे. मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून मिळणारी अतिरिक्त ऊर्जा ही हरित ऊर्जा असल्याकारणाने ती उपभोक्त्यांच्या खिशावरील ताण हलका करणारी ऊर्जा असेल. यंदाच्या उन्हाळ्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी उच्चांक मोडणारे कमाल तापमान नोंदविले गेले. अशा परिस्थितीत वीज प्रवाह खंडित झाल्यास जीवाची लाही लाही होऊन उष्माघात रुग्णांचे प्रमाण वाढले होते. अशा परिस्थितीत वाढता विजेचा वापर ही मनुष्य प्राण्याची अपरिहार्यता ठरते. या पार्श्वभूमीवर मुंबई ऊर्जा मार्ग लि यांचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणे हे जनतेच्या हिताचे ठरेल
चौकट:
प्रकल्प पूर्णत्वाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. प्रकल्पासाठी ज्या भूधारकांची जमीन वापरली जात आहे त्यांना मिळणारा परतावा हा समाधानकारक व न्याय्य असावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सध्याच्या घडीला २७७ भूधारकांना आम्ही परतावा दिलेला आहे. बाकी भूधारकांना परतावा देण्याचे काम प्रामाणिकपणे सुरू आहे.
– सुरजित नारायण
प्रकल्प अधिकारी,मुंबई ऊर्जा मार्ग ली.
