ठाणे : ठाणे शहरातील लोकवस्तीतील मुले वंचित नसून भाग्यवान आहेत कारण त्यांना व्यक्त होण्यास त्यांचा स्वतःचा अवकाश मिळाला आहे. गरिबीमुळे कच न खाता कष्ट करत आलेल्या संधीचे सोने करण्याची उर्जा त्यांना इथे सापडते आहे. त्यामुळे हा वंचितांचा नव्हे संचिताचा रंगमंच आहे, अशा शब्दात सुप्रसिद्ध चित्रकार आणि कवी विजयराज बोधनकर यांनी वंचितांच्या रंगमंचावरील मुलांची रंगतदार कामगिरी बघून गौरवोद्गार काढले. समता विचार प्रसारक संस्थेतर्फे काशिनाथ घाणेकर मिनीथिएटरमध्ये आयोजित वंचितांचा रंगमंचाच्या दशकपूर्ती सोहोळ्यात ठाण्यातील विविध वस्तीतील युवांच्या, उल्हासात पार पडलेल्या युवा नाट्यजल्लोष मध्ये ते बोलत होते.
वंचितांच्या रंगमंचाचे प्रणेते स्मृतिशेष रत्नाकर मतकरी यांच्या स्मृतीस वंदन करून, साने गुरुजींच्या १२५ व्या जयंतीवर्षा निमित्त महाराष्ट्रात चालू असलेल्या साने गुरुजी १२५ अभियानांतर्गत नाट्यजल्लोषचे यंदा दहावे पर्व सादर झाले. या वेळेस मान्यवरांनी मुलांचे कौतुक करत त्यांना अशा प्रकारच्या उपक्रमात सहभागी होण्याची प्रेरणा दिली. नाट्यप्रशिक्षण शिबिर घेणाऱ्या थिएटर कोलाज च्या सुप्रसिद्ध प्रशिक्षक पल्लवी वाघ – केळकर मुलांच्या प्रयत्नांची प्रशंसा करुन म्हणाल्या की, इथे जगण्यातच संघर्ष आहे त्यामुळे खरे नाटक सापडते आणि मुलांच्या कलेला कसलीही भिंत नसते, भेद नसतो आणि मुलांच्या प्रगतीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. या वेळेस ‘दीवार म्हणजेच भिंत’ या विषयाच्या अनेक पैलूंवर आधारित नाटिका सादर झाल्या. डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी ‘पाडू चलारे भिंत ही मध्ये आड येणारी’ हे गीत सादर करून थीमचं महत्व अधोरेखित केलं. ठाणे शहरातील विविध वस्तीतील युवांनी एकत्र येत ‘आधार’ ही नाटिका सादर केली. वेगवेगळ्या भिंती कशा दुःखितांच्या आधार बनतात हे नाटिकेतून प्रभावीपणे सादर केलं. अंबिका नगर गटाने ‘ ढ ची गोष्ट’ या नाटिकेत विद्यार्थी हुशार किंवा ढ असे नसतात. कुणी अभ्यासात तर कुणी खेळात तर कुणी कलेत हुशार असतात व अन्य कशात तरी ढ असतात. मित्रांनी एकमेकांना मदत करुन पाठबळ दिलं तर हुशार आणि ढ ही दीवार पाडली जाईल व ढ समजले जाणारे विद्यार्थी सुद्धा पास होतील हे विनोदी अंगाने छान सादर केलं. घणसोली गटाने ‘हे जीवन सुंदर आहे’ या नाटकात खेडेगावातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या मुलीला अनेक अपमानास्पद वागणुकींना कसं सामोरं जावं लागतं व अशा वेळी नैराश्य येऊन आत्महत्येचे विचार तिच्या मनात घोळत असताना तिची मैत्रीण तिला या विचारापासून कशी दूर नेते आणि तिच्यात कसा आत्मविश्वास निर्माण करते, हे अतिशय प्रभावी पद्धतीने दाखवलं. खारटन रोड गटाने ‘ आवाज उठाओ’ या नाटकात अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धारिष्ट दाखवलं तर श्रीमंत आणि गरीब यातील भिंत पाडायला वेळ लागणार नाही हे उत्तम प्रकारे सादर केले. याच बरोबर एनॉक कोलियार याने निर्माण केलेली ‘मिरास’ आणि मयुर बने याने बनवलेली ‘पॉईंट ऑफ व्ह्यू’ या सुंदर शॉर्टफिल्म्स दाखवल्या गेल्या. वैष्णवी कारंडे आणि करीना साऊद यांनी कोळी नृत्य पेश केलं. राबोडी मधील अल्फिया, फलक, मुस्कान, शिफा या मुलींनी मुशायरा पेश करून प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमात समता विचार प्रसारक संस्थेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, एपिकॉन कंपनीचे चेअरमन जयंत कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक मीनल उत्तुरकरांनी तर आभार प्रदर्शन हर्षलता कदम यांनी केले. वंचितांच्या रंगमंचाच्या संयोजिका हर्षदा बोरकर आणि एकलव्य कार्यकर्ता दर्शन पडवळ यांनी सुत्र संचालन केलं. लोकवस्तीतील युवांच्या नाटिका बघून त्यांचे कौतुक करण्यासाठी लघुपटकार डॉ. संतोष पाठारे, नाट्यजल्लोष ची आयोजक, प्रसिद्ध लेखिका व अभिनेत्री सुप्रिया मतकरी विनोद, यू ट्युबर रवींद्र पोखरकर, जगदीश खैरालिया, सीमा साळुंखे, मयूरेश भडसावळे, टॅगचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. मुलांना सहाय्यक म्हणून सुनीता फडके, सुयश पुरोहित, विश्वनाथ चांदोरकर,नीलिमा सबनीस यांनी मदत केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लतिका सु. मो. , सुनिल दिवेकर, अजय भोसले, किशन सिंग बेदी, निलेश दंत आदींनी मेहनत घेतली. लोकवस्तीतील एकलव्य युवा दीपक, अक्षता, एंजेल, माही, मयुर, अनमोल, स्नेहा, साक्षी, प्रसन्न यांनी छान अभिनय केला. सृष्टी, ऋतुजा, कार्तिक, अथर्व, साक्षी, यशस्वी, हेमाली यांनी प्रभावी अभिनय करून प्रेक्षकांना हसवलं. नेहा, श्रद्धा, तेजस्वी, राधिका, सायली, सानिका, कार्तिकी, अस्मिता यांनी नाटिकेत सहभाग घेतला. किशन, अश्रफीय, एंजेल, रुद्र, टिया, निखिल, निकिता, दिव्या, प्रमिता यांनी छान कामे केली.
0000