कराड – महाविकास आघाडीत कुठेही बिघाडी नाही. आम्ही १८० जागांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करू, सांगलीच्या निकालातून धडा घ्यायला हवा असं विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी करून उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, साताऱ्यात महाविकास आघाडीचा धक्कादायक पराभव झाला हे मान्य करावे लागेल. आम्ही यात कमी पडलो. या निकालाचं विश्लेषण करतोय. सांगलीची परिस्थिती वेगळी आहे. त्याठिकाणी अपक्ष उमेदवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. त्यामुळे जनसामान्यांच्या, कार्यकर्त्यांच्या इच्छेविरोधात तिकीट देऊ नये हा धडा सांगलीतून घेण्याचा आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच महाविकास आघाडी ज्या ताकदीनं लोकसभा निवडणूक लढली, त्यापेक्षा अधिक ताकदीने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. आता आम्ही १५८ विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहोत. आमचा प्रयत्न १८० जागांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न आहे असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
दरम्यान, जर इंडिया आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा करून लोकसभा अध्यक्ष ठरवला गेला तर निश्चित त्यांना पाठिंबा दिला जाईल. ही लोकशाहीची परंपरा आहे. परंतु रेटून जर काही चालवायचा प्रयत्न झाला तर आम्हालाही आमचा उमेदवार उभा करावा लागेल. दिल्लीत सभागृहाच्या समन्वयाचं काम करतायेत त्यांनी हे नियोजन केले पाहिजे असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले.
