वडीगोद्री जालना) : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज सहावा दिवस असून दोघांनीही वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान सरकार ओबीसी आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आंदोलक आज आक्रमक झाले आणि त्यांनी धुळे- सोलापूर महामार्गावर वडीगोद्री येथे रस्तारोको सुरू केला.

दरम्यान हाके आणि वाघमारे या दोघांचीही जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पथकाने वैद्यकीय तपासणी केली. दोन्ही आंदोलकांचे ब्लड प्रेशर चांगल आहे. मात्र, पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना भोवळ येत आहे. उपचाराची विनंती केली असता उपचार घेण्यास दोघांनी नकार दिल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील यांनी सांगितले. दरम्यान, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवत असताना सरकार दखल घेत नसल्याचा आरोप करत आज सायंकाळी ६. १५ मिनिटांनी आंदोलकांनी धुळे- सोलापूर महामार्गावर वडीगोद्री येथे रस्तारोको सुरू केला आहे.

धुळे-सोलापूर महामार्गावर वडीगोद्री येथे ओबीसी बांधवांनी रस्त्यावर येऊन रास्तारोको सुरू केला आहे. हे जातीवादी मुख्यमंत्री आणि सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी केला. उपोषणकर्ते जीवाचं रान करत आहेत, त्यांचा बीपी सुद्धा वाढलेला आहे. तरीसुद्धा सरकार कुठलीही भूमिका घेत नसल्याचा संताप आंदोलकांनी व्यक्त केला. आंदोलकांनी अचानक रस्तारोको सुरू केल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे. पोलिस आंदोलकांना समजविण्याच्या प्रयत्न करत आहेत. मात्र, आंदोलक रस्त्यावर बसून आहेत. काही आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने ओबीसी आरक्षण संपवण्याचा शासनाचा घाट असून लोकनियुक्त सरकार राज्यघटनेशी धोका करत आहे, असा सनसनाटी आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज केला.

धुळे -सोलापूर महामार्ग वडीगोद्री येथे आक्रमक ओबीसी आंदोलकांनी रोखल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळत राज्य सरकारचा निषेध केला. यावेळी पोलिसांनी दखल घेतल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांत झटापट झाली. दरम्यान, ओबीसी नेते उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याची विनंती केली. त्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *