अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी

ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) या प्रवेश परीक्षांचे नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. बार्टीमार्फत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी जेईई -100 व नीट-100 जागांकरिता प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केले आहे.

या प्रशिक्षणासाठी विद्यार्थी इयत्ता 11 (विज्ञान) शाखेत प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याजवळ महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास दाखला असावा. कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या घरात असावे. विद्यार्थी दिव्यांग असल्यास 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी.

जेईई (JEE) आणि नीट (NEET) प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी नमुद केल्याप्रमाणे महिला 30 टक्के, दिव्यांग  5 टक्के, अनाथ 1 टक्के, वंचित 5 टक्के जागा आरक्षित असतील. प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने इयत्ता 10 वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता निहाय उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणाचा कालावधी 24 महिन्यांचा असणार आहे. प्रशिक्षण काळात 75 टक्के पेक्षा जास्त उपस्थिती राहिल्यास विद्यार्थ्यांना दरमहा रु.6000/- एवढे विद्यावेतन दिले जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संचाकरीता प्रती विद्यार्थी रु.5000/- एवढी एकरकमी रक्कम अदा करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30/06/2024 आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी https://jee-neet.barti.co.in/public/ या लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक सुनिल वारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *