ठाणे : पालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या माध्यमातून यंदा मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाई सेवा उपलब्ध करून दिली होती, तसेच सवलती अन् वेळेत ग्राहकांच्या प्राप्त झालेल्या देयकांमुळे १ एप्रिल ते १५ जून या तीन महिन्यांच्या कालावधीत २६७ कोटींची विक्रमी वसुली झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली, तर मागील वर्षी याच कालावधीत २५३ कोटी ८६ लाख रुपये वसूल झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १३ लाख १४ हजार रुपये अधिक वसूल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेने करदात्यांना मालमत्ता कर भरण्याची योजना १ एप्रिल ते १५ जून या कालावधीत राबविली होती. त्यानुसार करदात्यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या सहामाहीतील मालमत्ता कराची रक्कम दुसऱ्या सहामाहीच्या करासह एकत्रितपणे जमा केली, तर दुसऱ्या सहामाहीतील करदात्यांना सामान्य करात १० टक्के सवलत दिली होती. या कालावधीतील रक्कम १६ ते ३० जून या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी करदात्यांना सामान्य कर रकमेवर ४ टक्के सवलत जाहीर केली होती. आयुक्त सौरभ राव म्हणाले की, या सवलतीला करदात्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून सामान्य करातील १० टक्के सूट आता ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.
कर वसुलीच्या उपाययोजना
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक/करदात्यांना मालमत्ता संबंधित ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये करदात्यांना त्यांच्या घरातून किंवा कार्यालयातून मालमत्ता कराशी संबंधित सर्व सुविधांचा लाभ घेता येणार आहे. तुमच्या मालमत्तेवर किती कर थकीत आहे. किती दंड असेल, तर किती मालमत्ता कर भरावा लागेल, याची उत्तरे महापालिकेच्या वेबसाइटवरून नागरिकांना घरबसल्या मिळतील, अशी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. कोणत्याही प्रकारची माहिती घेण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात येऊन कोणालाही भेटण्याची गरज भासू नये, यासाठी ही प्रक्रिया सुलभ करण्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
विभाग समिती कार्यालयातील संकलन केंद्र
महापालिकेच्या कर विभागाचे उपायुक्त जी. जी. गोदापुरे म्हणाले की, मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व विभाग समिती कार्यालयांत संकलन केंद्रे सुरू केली आहेत. मालमत्ताधारक सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत केंद्रावर येऊन मालमत्ता कर भरू शकतात. याशिवाय ऑनलाईन कर भरण्याची सुविधाही सुरू आहे. करदात्यांना त्यांच्या देयकाची संगणकीकृत प्रत propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे किंवा प्रभाग कार्यालयातील संकलन केंद्रातून मिळू शकते, तसेच या लिंकद्वारे, करदाते इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम ॲपद्वारे त्यांचा मालमत्ता कर ऑनलाइन जमा करू शकतात.
