डोंबिवली एमआयडीसीतील युवा उद्योजकांची उव्दिग्नता

 

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील सुमा्रे ४५ रासायनिक कंपन्यांना शासनाने बंद करण्याच्या दिलेल्या नोटिसा आणि त्यात एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या कंपनी स्फोटांंच्या मालिका, या सगळ्या प्रकाराने सरळमार्गी काम करणाऱ्या उद्योजकांनाही खूप त्रास सहन करावा लागत आहे. कंपनी चालक असलेल्या आपल्या घरातील कर्त्या पुरुषाला होत असलेला हा त्रास पाहून त्यांच्यासोबत काम करणारी त्यांची मुले म्हणजेच, युवा उद्योजकांनी उव्दिग्न होऊन तुरुंगात जावे लागत असेल तर कंपनीच बंंद करू, असा सल्ला वडिलांना दिला आहे.
डोंबिवली एमआयडीसीत मागील साठ वर्षांपासून उद्योजक व्यवसाय करत आहेत. आता कंपनी चालकांची तिसरी पीढी उद्योजक म्हणून पुढे येत आहे. अनेक कंंपनी चालकांची मुले, मुली परदेशातून उच्च शिक्षण घेऊन डोंबिवली एमआयडीसीतील आपल्या आजोबांनी सुरू करून वडिलांनी पुढे चालविलेला उद्योग अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. या उच्चशिक्षित नव उद्योजकांनी आपल्या कंपनीतील जुन्या पारंपारिक ढाच्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानात्मक बदल केले आहेत. त्यामुळे उत्पादन प्रक्रिया वाढली आहे, असे उद्योजक सांगतात.
अनेक कंपन्यांमध्ये आता कंपनी सुरू करणारे आजोबा, वडील आणि मुलगा, मुलगी (नातू) असे चित्र दिसते. आपली कंपनी आता आपली मुले पुढे नेणार आहेत. म्हणून कंपनी संचालक मंडळात बहुतांशी कंंपनी चालकांनी आपली पत्नी, उच्चशिक्षित आपली मुले, मुली यांना संचालक, भागीदार म्हणून घेतले आहे. कंपनीतील उत्पादन प्रक्रिया अधिक पारदर्शक, सचोटीने करून वर्षातून दोन ते तीन वेळा कंपनीच्या प्रवेशव्दारावर येणारे शासकीय अधिकारी कंपनी तपासणी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही हेतूने येणार नाहीत, अशी व्यवस्था या नवतरुण उद्योजकांनी कंपनीत केली आहे.
एमआयडीसीतील अमुदान कंपनी स्फोटानंतर या कंपनी मालकाला झालेली अटक. भागीदार वृद्ध आईला झालेला त्रास पाहून एमआयडीसीतील अनेक उद्योजकांच्या युवा उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली असेल तर संबंधितांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे. परंतु, एका कंपनीत स्फोट होतो. सरसकट सर्वच रासायनिक कंपन्यांंना कंपनी बंदच्या नोटिसा, स्थलांतरासाठी शासनाकडून आग्रह धरला जात असेल. कंपनीतील स्फोटानंतर पोलीस गुन्हा दाखल होऊन तुरुंगात जावे लागत असेल तर कंपनी बंद करून दुसरे काही सुरु करू, असा सल्ला युवा उद्योजकांनी आपल्या वडिलांना देण्यास सुरुवात केली.
एका उद्योजक तरुणीने तर उद्योग विस्ताराचे स्वप्न घेऊन मी या व्यवसायात आले आहे. विवाह, कुटुंब या गोष्टी न पाहताच मी जर तुरुंगात जाणार असेल तर आपणास कंपनी चालविण्यास अजिबात रस नाही, असे मत नाव छापण्याच्या अटीवर व्यक्त केले. कंपनी स्फोटानंतर संंबंधित कंंपनीचे मालक असलेले कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होते, असा अनुभव अनेक उद्योजकांनी सांगितला. डोंबिवली एमआयडीसीतील कंपनी बंद नोटिसा, स्फोटांच्या मालिका, त्यामुळे इतर उद्योजकांना होणारा त्रास पाहून नव उद्योजक आपल्या पारंपरिक उद्योगातून बाहेर पडण्याचा गांभीर्याने विचार करू लागले आहेत.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *