संजय शिरसाठांची भुजबळ तर, मिटकरींची भाजपाविरोधात बोंब

स्वाती घोसाळकर

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर भाजपाप्रणीत महायुतीतील धुसफूस दिवसागणिक सार्वजनिक होऊ लागली आहे. आपल्या पक्षाच्या नेत्याला वाचवण्याच्या नादात पक्षाचे प्रमुख प्रवक्ते दुसऱ्या पक्षाविरोधात बोंब मारू लागले आहेत. विधानसभेच्या निवडणूकीस अद्याप काही महिन्यांचा अवधी असला तरी महायुतीतच मित्रपक्षांविरोधात राजकीय बोंबाबोंबीस सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींनी तर थेट भाजपलाच दम देत अजित पवारांवरील टिका न थांबविल्यास वेगळा विचार करावा लागेल असे स्फोटक विधान केलेय. तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी छगन भुजबळांना सध्या उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत येत असलेल्या पुळक्याबाबत जाहिर टीका केली आहे

“छगन भुजबळ यांच्या भूमिका काहीवेळा गोंधळलेल्या असतात. त्यांच्या भूमिका गोंधळात टाकणाऱ्या का असतात ते त्यांनाच माहिती. मात्र, आजकाल ते उबाठा गटाचीही पाठराखण करायला लागले आहेत. आता त्यांची भूमिका काय असली पाहिजे? काय नसली पाहिजे? हा त्यांचा निर्णय आहे. पण दररोजच्या त्यांच्या विधानामुळे महायुतीमध्ये निश्चतच थोडीशी चलबिचल आहे, हे मान्य करावं लागेल”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

तर दुसरीकडे अमोल मिटकरीही आक्रमक झालेत. .

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुतीच्या पराभवास अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जबाबदार धरलं जात आहे. भाजप नेत्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवारांमुळे आमची मतं वाढल्याचं म्हटलं. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मासिकातून थेट अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे अजित पवारांचे आमदार असलेल्या बहुतांश मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना मतदानात पिछाडीवर जावे लागले आहे. तर, मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे यांनीही अजित पवारांच्या पक्षाने आपणास मदत न केल्याचं जाहीरपणे बोलून दाखवलं होतं. निवडणूक निकालात अजित पवारांच्या आमदारांचा म्हणावा तेवढा फायदा भाजपला झाला नाही. त्यामुळे, अजित पवार महायुतीच्या पराभवाचे व्हिलन ठरवले जात आहेत. त्यावरुन, आता अमोल मिटकरी यांनी थेट इशाराच दिला आहे. ”भारतीय जनता पार्टीच्या एका बैठकीत अजित पवार यांच्यामुळे आपला पराभव झाला अशा पद्धतीची भावना काही आमदारांनी व्यक्त केली. माझं त्यांना सांगणं आहे की, जर जाणीवपूर्वक अजित पवारांना टार्गेट केलं जात असेल तर आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल,” अशा शब्दात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

सुनील तटकरेंची मिटकरींना ताकीद

दरम्यान भाजपाविरोधात बेधडक विधाने करणे अमोल मिटकरी यांना महागात पडले आहे. अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मिटकरी यांना ताकीद दिली असून यापुढे प्रदेशाध्यक्षांची परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही वक्तव्य करु नये अशी समज मिटकरी यांना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *