अध्यक्ष अजितदादा पवार यांची वार्षिक सभेत घोषणा
मुंबई:- महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.ची चौवार्षिक निवडणूक २१ जुलै २०२४ रोजी होणार. असे राज्य संघटनेचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी वार्षिक सभेत जाहीर केले. राज्य कबड्डी संघटनेची वार्षिक सभा १८जून २०२४ रोजी सकाळी दादर येथील कबड्डी महर्षी स्व. शंकरराव(बुवा) साळवी सभागृहात होऊन विषय पत्रिकेवरी सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी अजितदादा पवार होते. होणारी निवडणूक ही प्रचलित घटने प्रमाणे पण क्रीडा संहितेला आधारभूत ठेवून घेतली जाईल असे पवार म्हणाले. निवृत्त न्यायधीश दिलीप जोशी यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्तीला या सभेने मंजुरी दिली. या निवडणुकी करीता संलग्न २५ जिल्हा संघटनेकडून प्रत्येकी चार(४) प्रतिनिधींची नावे (त्यात एक महिला प्रतिनिधींचे नाव असणे आवश्यक राहील) राज्य संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी एका परीपत्रकाद्वारे मागविली आहेत.
शासनाच्या क्रीडा आचार संहितेचा सर्वांनी मान राखून त्याची अंमलबजावणी करणे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्राची क्रीडा परंपरा फार जुनी असून ती देखील जोपासली गेली पाहिजे असे ते पुढे म्हणाले. या सभेला पदाधिकारी, प्रतिनिधी, आजीव सदस्य, खेळाडू असे सर्व मिळून २०० सदस्य हजर होते. त्यात मुंबई शहरचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, माजी आमदार दिनकर पाटील, आमदार अमरसिंह पंडित, शकुंतला खटावकर आदी मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती एका पत्रकाद्वारे संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी सर्व प्रसार माध्यमांना दिली.
000000
