एमएमआरसीचे नागरिकांना आवाहन

 

मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेलगतच्या परिसरात वृक्षारोपण करावे असे आवाहन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) नागरिकांना केले आहे. नागरिकांनी लावलेल्या झाडांची तीन वर्ष देखभाल करण्याची जबाबदारी ठेकेदारावर सोपविण्यात येणार आहे.
मेट्रो ३ मार्गिकेच्या कामासाठी ३३.५ किमी परिसरातील झाडे मोठ्या संख्येने कापण्यात आली आहेत. तर आरे कारशेडमधील झाडांची कत्तल तर मोठा वादाचा विषय ठरला आहे. एकूणच मेट्रो ३ मार्गिकेत करण्यात आलेली झाडांची कत्तल लक्षात घेता याची नुकसानभरपाई म्हणून मेट्रो ३ च्या मार्गिकेच्या परिसरात मोठ्या संख्येने झाडे लावण्याचा निर्णय एमएमआरसीने घेतला आहे. वृक्षारोपणासंबंधीचे प्रतिज्ञापत्र एमएमआरसीने उच्च न्यायालयात सादर केले आहे. त्यानुसार मेट्रो स्थानक परिसरात वृक्षारोपण करण्यात येत आहे. तर आता एमएमआरसीने नागरिकांनाही वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले आहे. सरकारी, खासगी कार्यालये, निवासी संकुले, शैक्षणिक संस्था, रुग्णालये आदी आस्थापनांना एमएमआरसीने वृक्षारोपणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. वृक्षारोपणासाठीची झाडे आणि झाडांच्या लागवडीसाठी एमएमआरसीकडून मदत केली जाणार आहे. झाड लावल्यानंतर पुढील तीन वर्ष या झाडांच्या देखभालीची जबाबदारी एमएमआरसीच्या ठेकेदाराची असणार आहे.
मेट्रो ३ मार्गिकेच्या आसपासच्या ५०० मीटरच्या परिसरात वृक्षारोपण करण्यास प्राधान्य असणार आहे. तेव्हा वृक्षारोपणासाठी इच्छुक नागरिक, गृहनिर्माण संस्था, इतर संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. http://mmrcl.com/en/documents/5635/public%20Notice%20 या संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. १५ जुलैपर्यंत यासाठी एमएमआरसीकडून अर्ज स्वीकारले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याशी संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी आणि वृक्षारोपण उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन एमएमआरसीने केले आहे.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *