११ जागांसाठी १२ जुलैला मतदान
मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. राज्यातील ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला मतदान होणार आहि. विधानसभा सदस्यांमधून निवडून दिलेले विधान परिषदेतील ११ सदस्य निवृत्त होत असल्याने रिक्त होणा-या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी निवडणूक होत आहे.विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता या निवडणुकीत भाजपाप्रणीत महायुतीचा वरचष्मा राहील. तर लोकसभा निवडणुकीत यश मिळालेल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे.
विधानसभा सदस्यांमधून निवडून दिलेल्या विधान परिषदेतील सदस्य मनिषा कायंदे ( शिंदे शिवसेना ),भाई गिरकर ( भाजपा ) बाबाजानी दिर्राणी ( राष्ट्रवादी- अजित पवार गट ), निलय नाईक ( भाजपा ), अनिल परब ( ठाकरे- शिवसेना ) रमेश पाटील ( भाजपा ), रामराव पाटील ( भाजपा ), वजाहत मिर्झा ( काँग्रेस ) , प्रज्ञा सातव ( काँग्रेस ),महादेव जानकर ( रासप ) आणि जयंत पाटील ( शेकाप ) या सदस्यांची मुदत येत्या २७ जुलै रोजी संपत असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.त्यानुसार विधान परिषदेच्या ११ जागांसाठी येत्या २ जुलै पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. तर ५ जुलै उमेदवारी मागे घेण्याची तारीख असून, १२ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे.त्याच दिवशी ५ वाजता मतमोजणी करण्यात येईल.
काँग्रेसचा राजीनामा देवून शिंदे गटाकडून रामटेकमधून लोकसभा लढवलेले राजू पारवे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.वरोराच्या काँग्रेसच्या आमदार या चंद्रपूरमधून लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.त्यांची राज्यसभेवर वर्णी लागल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे छ.संभाजीनगर मधून लोकसभेवर गेल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. धारावीच्या काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड या लोकसभेत विजयी झाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.जोगेश्वरीचे शिंदे गटाचे आमदार रवींद्र वायकर हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
शिंदे गटाचे खानापूरचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त आहे.काँग्रेसचे करवीरचे आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे.कारंजाचे भाजपाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनामुळे कारंजाची जागा रिक्त आहे.भाजपाचे अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे येथील जागा रिक्त आहे.काँग्रेसचे आमदार सुनिल केदार यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणी दोषी ठरविल्याने त्यांनी अपात्र ठरविण्यात आले आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला असला तरी त्यांच्यावर अपात्रेची टांगती तलवार कायम आहे. काही आमदारांच्या निधनामुळे तर काही आमदार लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने विधानसभेतील एकूण १४ आमदारांच्या जागा रिक्त असल्याने विधान परिषद निवडणुकीत २७४ आमदार मतदान करतील.११ जागांसाठी होणा-या या निवडणुकीत विजयी होण्यासाठी २३ मतांचा कोटा आवश्यक असणार आहे.सध्याचे विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता महायुती आणि काँग्रेसला विधान परिषद निवडणुक सुलभ होवू शकते तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षात फाटाफुट झाल्याने त्यांना निवडणूक अडचणीची ठरू शकते.
विधानसभेतील सध्याचे संख्याबळ
शिवसेना फुटीमुळे शिवसेनेच्या ५३ जागांपैकी शिंदे यांच्या शिवसेनेकडे ४० आमदार आहेत.तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे १५ आमदार आहेत.राष्ट्रवादीच्या फुटीमुळे अजित पवार गटाकडे ४० तर शरद पवार यांच्या गटाकडे १३ आमदार आहेत.विधानसभेत भाजपाचे १०३ तर काँग्रेस ४३ संख्याबळ आहे. विधानसभेत बहुजन विकास आघाडीचे ३,समाजवादी पक्षाचे २, एमआयएमचे २,प्रहार जनशक्ती पक्षाचे २ , मनसे १, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया ( मार्क्सवादी ) १ , शेतकरी कामगार पक्ष १, स्वाभिमानी पक्षाचा एक आमदार असून, देवेंद्र भूयार यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे.राष्ट्रीय समाज पक्ष १, जनसुराज्य पक्ष १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष १, अपक्ष १३ असे संख्याबळ आहे.
