शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सरकारी कर्मचारीवर्गासाठी
अनिल ठाणेकर
ठाणे : १२ वर्षात प्रत्येक अधिवेशनात वरिष्ठ सभागृहात १०० टक्के उपस्थिती लावून महाराष्ट्रातील व कोकणातील प्रश्न सातत्याने मांडणारा, त्यासाठी आवाज उठविणारा व फाॅलोअप घेऊन प्रश्न सोडविणारा आमदार म्हणून निरंजन डावखरे ओळखले जातात, असे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले. निरंजन डावखरे यांना इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी करा की ठाण्याच्या नादी लागण्याची हिंमत पुन्हा कोणी करणार नाही, असे उद्गार खासदार नरेश म्हस्के यांनी काढले. तर शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सरकारी कर्मचारीवर्गासाठी जुनी पेन्शन योजनेला येत्या अधिवेशनात निश्चितच मंजूरी मिळेल, असा विश्वास कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला.
कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुती पुरस्कृत भाजप उमेदवार आ. निरंजन वसंतराव डावखरे यांच्या विजय संकल्प मेळाव्यात प्रमुख पाहूणे म्हणून ना. रविंद्र चव्हाण बोलत होते. यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, आ.निरंजन डावखरे, माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक दिलीप बारटक्के, भरत चव्हाण, एकनाथ भोईर, राधाबाई जाधवर, दिगंबर ठाकूर, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे अध्यक्ष सचिन मोरे, शिवाई विद्यालयाच्या अध्यक्षा सुलेखा चव्हाण, आर जे ठाकूर काॅलेजचे विश्वस्त मंगेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याला ठाणे परिसरातील विविध शाळांचे संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
निरंजन डावखरे यांनी गेल्या १२ वर्षातील आमदारकीच्या कारकीर्दीत प्रत्येक अधिवेशनात हजेरी लावून वरिष्ठ सभागृहात १०० टक्के उपस्थिती नोंदविलेली आहे. तसेच प्रत्येक अधिवेशनात महाराष्ट्रातील, कोकणातील व ठाण्यातील जनतेचे प्रश्न सातत्याने मांडलेले आहेत. आवाज उठविलेला आहे. हे प्रश्न नुसते मांडून ते थांबले नाहीत तर सतत संबंधित विभागातील अधिकारी व मंत्री यांच्याकडे सतत फाॅलोअप घेत प्रश्न सोडविण्यासाठी निरंजन डावखरे हे सातत्यपूर्ण प्रयत्नशील राहिलेले आहेत.अशा कार्यशील उमेदवाराला निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बळावर नियोजनबद्ध प्रयत्न करायला हवेत. प्रत्येकी २५ मतदारांची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारायला हवी, मतदान होईपर्यंत मतदारांशो सातत्यपूर्ण संपर्क ठेवणे मतदानाच्या वेळेस त्यांना बुथपर्यंत नेण्याची व्यवस्था करणे, मतदान कसे करावे याची सततची माहिती देणे, मतदान बाद होणार नाही याची काळजी घेणे या पाच गोष्टीवर लक्ष दिल्यास निरंजन डावखरे हे विक्रमी मताधिक्याने निश्चित निवडून येतील अशी आशा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.
तर निरंजन डावखरे हे संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. पदवीधर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक व विद्यार्थी यांचे प्रश्न सातत्यपूर्ण मांडून ते सोडविण्याचे प्रयत्न केले आहेत. लोकसभा निवडणुकीत कोकणाने महायुतीला विजयाचा मार्ग दाखविलेला आहे. यामुळेच कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी करा की ठाण्याच्या नादी लागण्याची हिंमत पुन्हा कोणी करणार नाही, असे उद्गार ठाणे लोकसभेतील खासदार नरेश म्हस्के यांनी काढले.
सागरी, नागरी व डोंगरी अशा कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यात कोकण पदवीधर मतदारसंघ पसरलेला आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक, विद्यारथी यांचे विविध प्रश्न गत दोन टर्म मध्ये मार्गी लावण्यात आले आहेत. व्हिजन डाॅक्युमेंटमध्ये मिशन एज्युकेशन नुसार विद्यार्थी, संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार हायस्पीड इंटरनेट, डेटा व्यवस्थापन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांनो आणलेल्या क्रांतीचे आव्हान पेलण्यासाठी कौशल्य विकास, नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा कोकणातील पाचही जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाला लाभ मिळावा यासाठी समन्वय साधण्यात येणार आहे. जिल्हानिहाय व तालुकानिहाय प्रत्येक शाळेत डिजिटल रुम आणि रोबोटिक्स लॅब तसेच इलेक्ट्रॉनिक गॅझेट्ससाठी अखंड विजेची सुविधा प्राप्त करुन देणार, कोकणातील पाचही जिल्ह्यातील शाळा पुढील सहा वर्षांत टप्प्याटप्प्याने ग्रीन स्कूल करण्यात येईल. एमपीएससी, युपीएससी व अन्य स्पर्धा परिक्षांसाठी जिल्हानिहाय व तालुकानिहाय मार्गदर्शन केंद्र यात ग्रंथपाल, इंटरनेट सुविधा उपलब्ध करणार, अर्धवेळ ग्रंथपाल व प्रयोग शाळा सहाय्यकांना पूर्णवेळ सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नती गती देणार. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सरकारी कर्मचारीवर्गासाठी आवश्यक जुनी पेन्शन योजनेला येत्या अधिवेशनात निश्चितच मंजूरी मिळेल, असा विश्वास कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरें यांनी व्यक्त केला.
०००
