संजय वाघुलेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला आयुक्तांचे आश्वासन

 

ठाणे : ठाणे शहरातील सार्वजनिक मैदानांवरील व्यावसायिक प्रदर्शनाबाबत मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नियमावली निश्चित करण्यात येणार आहे. या नियमावलीनुसार वर्षातील ३६५ पैकी ४५ ते ५० दिवसांपर्यंत मैदानात प्रदर्शन भरविता येतील. तर उर्वरित काळ मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध होतील, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी काल मंगळवारी येथे दिली. त्याचबरोबरच वर्षातून दोन वेळा झाडांच्या फांद्या कापण्याचे, गावदेवी व ज्युपिटर हॉस्पिटलजवळील वाहनतळ लवकरच सुरू करण्याचे आश्वासन महापालिकेकडून देण्यात आले आहे.
ठाणे शहरातील नागरी समस्या व नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक- नगरसेविकांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची मंगळवारी सायंकाळी भेट घेतली. या शिष्टमंडळात माजी गटनेते नारायण पवार, मनोहर डुंबरे, भरत चव्हाण, मुकेश मोकाशी, कृष्णा पाटील, सुनेश जोशी, नंदा पाटील, दीपा गावंड, अर्चना मणेरा, कमल चौधरी, कविता पाटील, मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी, नम्रता कोळी, राजकुमार यादव आदींचा समावेश होता.
ठाण्यातील मुलांना जास्तीत जास्त दिवस खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध राहावीत, अशी भाजपाच्या शिष्टमंडळाने मागणी केली होती. त्यावर आयुक्त राव यांनी मुंबई महापालिकेचे मैदाने भाड्याने देण्याचे धोरण मागवून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मुंबई महापालिकेच्या धोरणानुसार ठाण्यात धोरण तयार केले जाईल. त्यामुळे केवळ ४५ ते ५० दिवसांपर्यंत सार्वजनिक मैदानात प्रदर्शन भरविता येणार आहेत, असे जिल्हाध्यक्ष वाघुले यांनी सांगितले.
वर्षातून दोनदा वृक्ष फांद्यांची छाटणी
रस्त्यालगतची झाडे व झाडांच्या फांद्या कोसळून होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वर्षभरातून दोन वेळा झाडांच्या धोकादायक झालेल्या फांद्या तोडण्याची विनंती भाजपाकडून करण्यात आली. त्यावेळी वर्षभरातून दोन वेळा झाडांच्या फांद्या तोडण्याच्या निविदा जारी करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
शहरातील दोन वाहनतळ लवकरच खुला
ज्युपिटर हॉस्पिटललगतच्या सर्व्हिस रोडवरील वाहतूककोंडी व गावदेवी भाजी मार्केट येथील दुचाकींचा वाहनतळ खुला करण्याची मागणी करण्यात आली. ज्युपिटर वाहनतळात १४०० वाहने पार्क होणार असून, तो वाहनतळ महिनाभरात खुला होईल. तर गावदेवी पार्किंगबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्त राव यांच्याकडून देण्यात आले.
बेकायदा होर्डिंगची पाहणी
शहरातील काही भागात महापालिकेकडून कमी क्षेत्रफळाची परवानगी घेऊन भव्य होर्डिंग उभारण्यात आले आहेत. तर अनेक ठिकाणी बेकायदा होर्डिंग थाटले आहेत. त्याबाबत तक्रार केल्यानंतर पाहणी करून तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्याचबरोबर शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्याची मागणीही भाजपाच्या शिष्टमंडळाने केली. त्यावरही कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *