मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदन कुलूपबंद करावे – नितीन देशपांडे

 

अनिल ठाणेकर

 

ठाणे : महाराष्ट्र सदनात भीषण पाणीटंचाई असताना, नवनियुक्त केंद्रीय मंत्री नीलाजारेपणाने चक्क मिनरल वॉटरने अंघोळ करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे जोपर्यंत दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र सदन कुलूपबंद करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी केली आहे.
दिल्लीतील पाणीटंचाईचा फटका नवीन महाराष्ट्र सदनालाही बसला असल्याचे दिसून आले असून, एका नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीवेळी बाहेरुन पाण्याच्या (मिनरल वॉटर) बाटल्या आणून, त्यांत्या्या आंघोळीची व्यवस्था करण्याची वेळ व्यवस्थापनावर आल्याचे धक्कादायक आणि तितकेच संतापजनक वास्तव उघड झालेले आहे. दिल्लीत भीषण पाणीटंचाई असताना, महाराष्ट्रातील एका नवनियुक्त केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र सदनात वास्तव्यास असणे आणि त्यांच्यासाठी पाणी उपलब्ध नसतानादेखील या केंद्रीय मंत्र्याने चक्क मिनरल वॉटरच्या फिल्टरच्या पाण्याने अंघोळ करणे, ही घटना म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. हे सरकार जनतेचे की लोकप्रतिनिधींचे असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, एकीकडे महाराष्ट्रातील दुर्गम खेड्यांत आणि आदिवासी पाड्यांत, पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असल्यामुळे, अबालवृद्धांना पाच-पाच किलोमीटरवरुन पाणी आणावे लागत असताना, दुसरीकडे महाराष्ट्र सदनात भीषण पाणीटंचाई असताना, हे नवनियुक्त केंद्रीय मंत्री नीलाजारेपणाने चक्क मिनरल वॉटरने अंघोळ करतात, यालाच असंवेदनशीलता म्हणतात. याबाबत ‘धर्मराज्य पक्षा’च्या भावना अतिशय तीव्र असून, जोपर्यंत दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र सदन कुलूपबंद करण्यात यावे आणि यासंदर्भात तातडीने कार्यवाही करीत, आपली संवेदनशीलता प्रकट करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करीत असल्याचे नितिन देशपांडे यांनी सांगितले आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *