महिंद्रा अँड महिंद्रा’च्या नावावर एक मोठी उपलब्धी नोंदवण्यात आली आहे. आनंद महिंद्रा यांच्या नेतृत्वाखालील या ऑटोमोबाईल कंपनीने ‘टाटा मोटर्स’ला मागे टाकले आहे. ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ आता बाजार मूल्यांकनाच्या बाबतीत देशातील दुसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी बनली आहे. ‘महिंद्रा अँड महिंद्रा’चे मार्केट कॅप 3,65,193 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ‘टाटा मोटर्स’चे मार्केट कॅप 3,29,041 कोटी रुपये आहे. देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी ‘मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड’ पहिल्या क्रमांकावर आहे. त्याची मार्केट कॅप चार लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. महिंद्राच्या शेअरमध्ये कमालीची वाढ झाली आहे. कंपनीच्या स्कॉर्पिओ, बोलेरो आणि थार या गाड्यांच्या विक्रीमध्ये उत्तम वाढ झाली आहे. मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये महिंद्राचा निव्वळ नफा 2038 कोटी रुपये होता. याशिवाय कंपनीकडे 2.2 लाख एसयूव्हींचे बुकिंगदेखील आहे. या वर्षी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे शेअर्स बहुतेक वेळा निफ्टीच्या टॉप गेनर्सच्या यादीत आपले स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत. गेल्या 52 आठवड्यांमध्ये या कंपनीच्या शेअरचे मूल्य सुमारे 71 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे कंपनीचे बाजार भांडवल 2 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढले आहे. सध्या, ‘महिंद्रा अँड महिंद्रा’कडे जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी होण्याचा मानही आहे. उत्पादन क्षमता वाढवून कंपनी नवीन उत्पादने बाजारात आणणार आहे. ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने 2025 ते 2027 या कालावधीत विस्तारासाठी 27 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.
sspयासोबतच स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (एसव्हीयू) आणि इलेक्ट्रिक व्हेईकल (ईव्ही) ची उत्पादन क्षमता मार्च 2026 पर्यंत दरमहा 72 हजार युनिटपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे. या वर्षी मार्चअखेर ही क्षमता दरमहा 49 हजार युनिट होती. यासोबतच कंपनी पुढील 6 वर्षांत 6 नवीन डिझेल एसव्हीयू लाँच करण्याची योजना आखत आहे.
