२७ जूनला अधीक्षक अभियंत्यांच्या दारात करणार ठिय्या आंदोलन
ठाणे : राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या विविध पायाभूत कामांची पूर्तता महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे सदस्य असलेल्या ठेकेदारांनी केली आहे. मात्र, त्यांची देयके देण्यात चालढकल करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे विभागिय अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. या मागण्या मान्य केल्यास येत्या गुरूवारी, २७ जून रोजी, अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा आवळे यांनी दिला आहे.
राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्राम विकास, जलजीवन मिशन विभाग, ग्रामविकास व जलसंधारणसारख्या अनेक शासनाच्या विभागाकडे काम करणाऱ्या कंत्राटदार यांची अनेक प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी शासन, मंत्री व प्रशासनाकडून शासन स्तरावर काहीही प्रयत्न होत नाही. याबाबत शासनास कंत्राटदार महासंघाने वेळोवेळी ५ मागण्याचा ड्राफ्ट दिला होता. पत्रव्यवहार व बैठक ही घेतली होते, परंतु शासन काहीही करीत नाही, असा आरोप करून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने ही निदर्शने केली. दरम्यान, राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्राम विकास जलजीवन मिशन, जलसंधारण, स्थानिक स्वराज्य संस्था इथे विकास कामे करणाऱ्या कंत्राटदार यांची देयके तातडीने देऊन कंत्राटदार त्यांचे कुटुंब व त्यावर अवलंबून असणारे व्यवसायिक यांची वर्षानुवर्षे देयकेच मिळत नसल्याने होणारी आर्थिक पिळवणूक व उपासमार तातडीने बंद करावी; राज्यातील सर्व विभागाकडील कामे मंजुरी करण्याच्या अगोदर त्या कामांना निधीची उपलब्धता असल्याशिवाय शासनाने सदर कामांसाठी कोणतीही निविदा प्रक्रिया अजिबात राबविण्यात येऊ नये, आदी मागण्यांचे निवेदन महासंघाने दिले असून या मागण्यांची आठवडाभरात पूर्तता न केल्यास अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
००००
