नवी मुंबई : महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रातील विकासात महत्वपूर्ण योगदान असणा-या राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणादायी कार्याला उजाळा देण्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या 26 मे रोजीच्या 150 व्या जयंती दिनाच्या औचित्याने शनिवार दि. 22 जून 2024 रोजी, सायं 6.30 वा., वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या तसेच डिजीटल अशा तिन्ही प्रसार माध्यमांमध्ये वीसहून अधिक वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असलेले व सध्या बीबीसी मराठीचे संपादकपद भूषविणारे संपादक, व्याख्याते श्री. अभिजीत कांबळे यांचे ‘राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक विचारांची दूरदृष्टी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.
शिक्षण हेच माणसाच्या प्रगतीचे प्रमुख साधन आहे हे ओळखून छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण प्रसारावर विशेष भर दिला. त्यासाठी त्यांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्रियांच्या शिक्षणाकडेही प्राधान्याने लक्ष दिले. शिक्षणाचे महत्व ओळखून त्याकाळी ठोस भूमिका घेत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणा-या राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीच्या शैक्षणिक विचारांना या निमित्ताने उजाळा मिळणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 15,  ऐरोली येथे उभारण्यात आलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे बाबासाहेबांच्या ‘ज्ञान हीच शक्ती’ या विचारसूत्रावर आधारित ‘ज्ञानस्मारक’ म्हणून येथे भेट देणा-या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व नागरिकांनी नावाजले आहे. याठिकाणी ‘विचारवेध’ शृंखलेंतर्गत नियमित आयोजित करण्यात येत असलेल्या मान्यवर वक्त्यांच्या व्याख्यानांतून श्रोत्यांना वैचारिक मेजवानी उपलब्ध करुन दिली जात आहे. या व्याख्यानांना नागरिकांचा नेहमीच उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे.
आधुनिक विज्ञाननिष्ठ समाजक्रांतीचे उद्गाते म्हणून मानांकित राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या सर्वस्पर्शी कार्याला अभिवादन करण्यासाठी व त्यांचे अतुलनीय कार्य जाणून घेण्यासाठी शनिवार, दि. 22 जून 2024 रोजी, ऐरोली मुलुंड खाडी पुलाजवळ, सेक्टर 15, ऐरोली येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात सायं. 6.30 वा. आयोजित करण्यात आलेल्या नामवंत व्याख्याते व संपादक श्री. अभिजीत कांबळे यांच्या ‘राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक विचारांची दूरदृष्टी’ या व्याख्यानाप्रसंगी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *