पालघर : पालघर जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. उपनगरीय गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या, तर काही ठिकाणी रेल्वे भुयारी मार्ग पाण्याने भरल्याने येण्या-जाण्याचा मार्गही बंद झाला होता. केळवे रोड रेल्वे स्थानक मार्गावरील रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने काही काळ वाहतूक बंद होती.
पालघरमध्ये बुधवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारी पावसाने उघडीप दिल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. पालघर परिसरात गुरुवारी सकाळपर्यंत १३० मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण ४५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रात्रीपासून विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळत होता. त्यामुळे काही काळ रस्त्यावर पाणी आले. सकाळच्या वेळी काही ठिकाणची वाहतूक बंद होती. केळवे रोड परिसरात पुलाखालून जोरदार पाणी वाहत होते. उमरोळी येथे रेल्वेच्या भुयारी मार्गात पाणी शिरल्याने येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले, तर काहींना दांडी मारावी लागल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. बोईसर रेल्वे स्थानकात पाणी रेल्वे ट्रॅकवर आल्याने रेल्वे वाहतूक मंदगतीने सुरू होती.
