बारामती : मोदींपेक्षा जास्त मताने तुम्ही तुमचा खासदार जिंकविला. मोदींची गॅरंटी इथे चालली नाही. शेतकऱ्याला कसे अडचणीत आणता येईल याचाच विचार हे मोदी सरकार करत असते. त्यांच्या म्हणण्यानुसार ते खाणाऱ्यांचा विचार करतात, अरे परंतू जर पिकवणाऱ्यानेच पिकवले नाही तर खाणारा खाणार तरी काय असा ? काहीही करा पण जमीन विकू नका, आपण मार्ग काढुया. आधी पाणी आणुया, मग कांडे रोवुया, पुढचा डोस कधी द्यायचा हे मी तुम्हाला सांगेन असे शरद पवार यांनी लोणी भापकरच्या गावकऱ्यांना सांगितले.

गेल्या तीन दिवसांपासून शरद पवार बारामती पिंजत असून गावोगावी जात राज्य हातात घेण्याचे वक्तव्य करत आहेत. शरद पवारअजित पवार यांच्या काटेवाडीतही त्यांनी सभा घेतली होती. आज लोणी भापकरमध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी आपले पुढारीच गायब झाले होते, तरीही लोकांनी दडपशाहीला झुगारून आपल्याला मतदान केल्याचे शरद पवार म्हणाले.

या निवडणुकीत एकही पुढारी दिसत नव्हता. मी विचारायचो कुठे गेला,  जेव्हा मतमोजणी झाली तेव्हा कळले. आता हाच चमत्कार विधानसभेलाही करायचा आहे. एक तुम्ही करा, एक मी करतो, असे संकेत पवारांनी दिले. आपण जनाई शिरसाई, पुरंदरच्या उपसा योजना केल्या आहेत. पण सत्तेत असलेल्यांनी त्याकडे पाहिलेही नाहीय. हे बदलायचे आहे. राज्यच हातात घ्यायचे आहे. दुधाचे अनुदान मिळविण्यासाठी हालचाली करायची तयारी आहे का, असा सवाल करत माझी तयारी असल्याचे पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *