मुंबई : ठाकेरेंच्या शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊत यांनी मोदींवर केलेल्या ब्रँड नव्हे ब्रँडीच्या टीकेवर उद्धव ठाकरेही दाद देत होते, याचं दुःख आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे. लोकसभेत ९ जागा आल्या त्याचा उन्माद दिसतोय. त्यामुळे मस्ती आलीय. ही मस्ती उतरवायला वेळ लागत नाही. तुमच्या जागा कशा निवडून आल्या हे काल एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे एवढा उन्माद करू नका, तुमची मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही, असे प्रत्युत्तर भाजपा आमदार गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना दिले.
मोदी हा ब्रँड होता आता ब्रँडी झाली आहे. मोदींचा खुळखुळा जर कोणी केला असेल तर तो उद्धव ठाकरेंनी केला, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली होती.
गिरीश महाजन म्हणाले की, राजकारणाचा स्तर घसरत चाललेला आहे. काल संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलले. मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय प्रधानमंत्री आहेत, असं असूनही इतक्या खालच्या पद्धतीवर बोलणं यातून ते नेमकं काय खाऊन काय पिऊन बोलतात हेच कळत नाही. ते दिवसभर नशेत असतात.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही विधानसभेचा प्रचार आत्तापासूनच करा, असे खुले आव्हान दिले. यावर गिरीश महाजन म्हणाले की, विजयामुळे फार उन्माद येऊ देऊ नका. बोलताना तारतम्य ठेवा. तुमची मोदींवर बोलण्याची पात्रता आहे का? जरा भान ठेवा. भाजपच्या महिला उमेदवारांबाबत संजय राऊत यांनी केलेली विधाने म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे, असे त्यांनी म्हटले.
