रामदास कदमांचा भाजपाला इशारा,

१०० जागा द्या, नाही तर २८८ लढू !

मुंबई: होळी संपली असली तरी महायुतीत अजुनही जोरदार शिमगा सुरु आहे. कधी राष्ट्रवादी तर कधी शिंदेंच्या शिवसेनेतले नेते भाजपाविरोधात बोंब ठोकतोय. काल अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अमित मिटकरींनी भाजपाच्या लोकसभेच्या ९ जागा या केवळ अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे निवडूण आल्या असे जाहीर वक्तव्य करीत मोदी गॅरंटीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. आज शिंदेच्या शिवसेनेच्या रामदास कदम यांनी एक कदम पुढे जात भाजपालाच दम दिला. गुमान विधान सभेच्या १०० जागा द्या नाहीतर २८८ जागांवर निवडणूक लढवू असा इशाराचा रामदास कदम यांनी दिला.

अजितदादांना जरा उशिरा घेतलं असतं तर त्यांच्या वाट्याला गेलेली 9 मंत्रिपदं शिवसेनेला मिळाली असती आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेल्यांना जॅकेट घालून बसावं लागलं नसतं अशी खोचक टिकाही रामदास कदम यांनी केली. सर्व्हेच्या नावाखाली आमचे उमेदवार बदलले, पण भाजपचेही उमेदवार पडलेच की, त्यामुळे सर्व्हे फक्त शिवसेनेचे उमेदवार बदलण्यासाठीच होते की काय असा सवाल करीत भाजपाच्या प्रामाणिकपणावरच त्यांनी सवाल उपस्थित केला.

जागावाटपावेळी जे झालं ते अतिशय घृणास्पद  झालं. रायगड आमचं, रत्नागिरी आमचं, अमरावती आमचीच असं सगळं भाजपने केलं. अतिशय विश्वासाने आम्ही भाजपसोबत गेलो होतो. जर एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली असतील तर महायुतीच्या आणखी जागा वाढल्या असत्या.

अमरावतीची जागा आमच्याकडून घेतली. त्या ठिकाणी अडसूळ आधी पडले होते ते ठीक. पण मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे दोनवेळा खासदार असतानाही ती जागा देवेंद्र फडणवीसांना जाहीर करावी लागली. त्यामुळे हा प्रकार पुन्हा न होता विधानसभेला आम्हाला 100 जागा द्या, म्हणजे आधी काम करता येईल.

लोकसभेच्या निवडणूकीत फक्त शिवसेनेच्या जागा बदलण्यासाठी सर्व्हे पुढे केला का असा प्रश्न पडतो. सर्व्हेच्या नावाखाली आमचे उमेदवार बदलले, काही उमेदवार आमच्यावर लादले. पण भाजपच्याही जागा पडल्या, त्यावर काय म्हणायचं? भावना गवळी, हेमंत गोडसे नको असं भाजपचं मत होतं. पण आम्ही तुमच्या जागांवर कधी बोललो का? तुमच्या उमेदवारांवर आक्षेप घेतले का? महायुतीचा लोकसभेत पराभव का झाला याचं विश्लेषण तीनही पक्षांनी करावं असं रामदास कदम म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या 21 जागा लढवल्या, मग आम्हाला कमी का मिळाल्या. आम्हाला जास्त जागा मिळाल्या असत्या तर आणखी खासदार निवडून आले असते. तुलाही नाही आणि मलाही नाही असं व्हायला नको. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला सत्ता आणायची आहे असेही रामदास कदम म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *