अशोक गायकवाड
नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ ला सामोरे जाताना स्वच्छता विषयक विविध उपक्रमांमध्ये व दैनंदिन बाबींमध्ये अधिक व्यापक लोकसहभाग घेण्यासाठी प्रयत्न केले जावेत असे निर्देशित करीत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शाळा व महाविदयालयीन विदयार्थी यांच्यासह त्यांच्या पालकांपर्यंत स्वच्छता संदेशाचे प्रसारण होण्याच्या दृष्टीने व्यापक कार्यवाही करावी असे सूचित केले.
‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध कामांचा बारकाईने आढावा घेताना आयुक्तांनी स्वच्छता ही आपल्या शहराची ओळख असल्याने ती अधिक उंचावणे ही आपली जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले व या कामी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा चालणार नाही असे स्पष्ट निर्देश दिले. स्वच्छतेची कार्यवाही नियमीतपणे योग्य रितीने होण्यासाठी व त्यावर त्रयस्थ यंत्रणेचे निरीक्षण असावे यादृष्टीने आठही विभागांसाठी विभागप्रमुख दर्जाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून या अधिकाऱ्यांनी त्या विभागाचे स्वच्छताविषयक ‘ पालक अधिकारी ’ म्हणून काम पाहावे असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. नवी मुंबईतील शाळा – महाविदयालये यामध्ये शिकणारी मुले व युवक हे आपल्या शहराचे भविष्य असल्याने स्वच्छता अभियानात त्यांना मोठया प्रमाणावर सक्रिय सहभागी करुन घेणे आणि त्यांना लहान वयापासूनच स्वच्छतेची सवय अंगिकारण्यासाठी प्रोत्साहीत करणे महत्वाचे असल्याचे सांगत स्वच्छतेविषयीच्या त्यांच्या मनातील अभिनव संकल्पना मांडण्यासाठी निबंध, वक्तृत्व, चित्रकला, पोस्टर्स, लघुपट अशा विविध स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे अशा सूचना आयुक्तांनी केल्या. शैक्षणिक संस्थांना त्यांच्या परिसरातील रस्ते, मार्केट स्वच्छतेच्या दृष्टीने दत्तक दयावेत अशीही अभिनव संकल्पना राबविण्याचे आयुक्तांनी सूचित केले. महानगरपालिका क्षेत्रातील मार्केट्स तसेच सोसायटया प्लास्टिकमुक्त असाव्यात यादृष्टीने कृती आराखडा तयार करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दयावा असे स्पष्ट करतानाच मार्केटमध्ये नागरिकांसाठी कापडी पिशव्यांच्या वेंडींग मशिन बसवाव्यात असे आयुक्तांनी स्पष्ट केले. स्वच्छता उपक्रमांमध्ये व जनजागृती कार्यामध्ये सेवाभावी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था तसेच महिला बचत गट यांचा अधिक प्रभावी उपयोग करुन घेण्याची कार्यवाही करावी अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.
ओला, सुका व घरगुती घातक अशा तीन प्रकारे कचऱ्याचे घरापासूनच वर्गीकरण केले जाण्यावर व तो महानगरपालिकेच्या घंटागाडीत वेगवेगळा दिला जाईल याकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश देण्यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचा ई-कचरा संकलित करण्यासाठी ठराविक दिवस निश्चित करावा आणि तो जाहीर करुन त्यादिवशी ई-कचरा संकलन मोहीम नियमीतपणे राबवावी असेही निेर्देश आयुक्तांनी दिले.प्रत्येक विभागातील यलो स्पॉट्स शोधून त्याठिकाणी तत्परतेने स्वच्छतागृहे उभारावीत तसेच उदयाने, बसडेपो, मार्केट याठिकाणची स्वच्छतागृहे नियमीत स्वच्छ व निटनेटकी राहतील आणि त्याठिकाणी स्वच्छ व शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल याकडेही बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडेही लक्ष देण्याचे सूचित करतानाच ही स्वच्छतागृहे सर्वांच्या वापरासाठी खुली राहतील व तशा प्रकारचा फलक त्याठिकाणी ठळकपणे प्रदर्शित राहील याकडेही लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले.रेल्वे स्टेशन व परिसर येथील स्वच्छतागृहेही सिडको प्राधिकरणामार्फत नियमित स्वच्छ राहतील याचीही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. महानगरपालिकेने उभारलेली सर्व सार्वजनिक व सामुदायिक शौचालये स्वच्छ व सुस्थितीत असतील याची काटेकोर काळजी घ्यावी असे स्पष्ट निर्देश देत यामध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे आयुक्तांनी स्पष्ट केले.दैनंदिन १०० किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणाऱ्या सोसायटयांनी आपल्या आवारातच ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱे प्रकल्प राबविणे गरजेचे असून त्यादृष्टीने कार्यवाही करावी व अशा सर्व सोसायटया याची अंमलबजावणी करतील याकडे काटेकोर लक्ष दयावे असे निर्देश् आयुक्तांनी दिले. अशाच प्रकारे १०० किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणाऱ्या हॉटेल्सकडूनही असे प्रकल्प राबविण्याची कार्यवाही करण्याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशित करण्यात आले. ‘झिरो वेस्ट स्लम’, ‘ड्राय वेस्ट बँक’, ‘फिश फेड’ या नाविन्यपूर्ण उपक्रमांची व्याप्ती वाढविण्याबाबतही आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले. शहर सुशोभिकरणासाठी लावण्यात आलेल्या शिल्पाकृती, कारंजे यांची आवश्यक डागडुजी व सफाई त्वरीत करुन घ्यावी तसेच ओल्या व सुक्या कचऱ्याचे रस्त्यांवर लावण्यात आलेले डस्टबिन सुस्थितीत करुन घ्यावेत असेही निर्देशित करण्यात आले.
दैनंदिन स्वच्छतेचे काम करणाऱ्या स्वच्छता मित्रांमार्फत स्वच्छता संदेशांचे प्रसारण होण्याच्या दृष्टीने त्यांना स्वच्छतेचा संदेश असणारे जॅकेट्स देण्यात यावेत तसेच पोस्टर्स, होर्डिंग्ज, चित्रभिंती, एनएमएमटी बसेस अशा विविध माध्यमांतून स्वच्छता संदेशांचे व्यापक स्वरुपात प्रसारण करण्यात यावे अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.
‘थ्री आर’ संकल्पने अंतर्गत कचरा कमी करणे, कचऱ्याचा पुनर्वापर करणे व कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणे या ‘थ्री आर’ संकल्पनेची शहरात ९२ मोक्याच्या ठिकाणी ‘माणुसकीचे देणे घेणे’ ही ‘थ्री आर सेंटर्स’ उभारुन अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. त्याचा अधिक प्रभावी रितीने वापर व्हावा यासाठी ठराविक दिवस जाहीर करावेत व त्या दिवशी नागरिकांनी त्यांच्या वापरातील नको असलेल्या गोष्टी तेथे आणून ठेवाव्यात व त्या वस्तूंची ज्यांना गरज आहे अशा व्यक्तींनी तिथून घेऊन जाव्यात, जेणेकरुन या सेंटर्सचा उत्तम रितीने नागरिकांना उपयोग होईल असेही आयुक्तांनी सूचित केले.आंब्याच्या कोयी संकलनाच्या गुठली रिटर्न्स उपक्रमाला नागरिकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला असून आता शाळा सुरु झालेल्या असल्याने प्रत्येक शाळेत कोयी संकलनासाठी एक कॉर्नर तयार करावा व त्यामध्ये विदयार्थ्यांनी आंब्याचा सिझन संपेपर्यंत घरातील कोयी आणव्यात अशाही सूचना आयुक्तांनी केल्या. सगळया शाळांमध्ये स्वच्छता वोटींगचा अभिनव उपक्रम राबवावा असेही आयुक्तांनी सूचित केले. माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षारोपण आणि संवर्धानावरही भर देण्यात यावा याबाबत सूचना करण्यात आल्या.
सफाई मित्रांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये सर्वांना आयुष्यमान भारत कार्ड, अटल पेन्शन योजना, त्यांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती अशा योजना राबविण्याचेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई महानगरपालिका राज्यात नेहमीच आघाडीवर राहिली असून शासन स्तरावरूनही नवी मुंबईकडून अपेक्षा व्यक्त केल्या जातात. त्यामुळे जबाबदारी ओळखून आपले मानांकन अधिक उंचावण्यासाठी आणि ‘निश्चय केला – नंबर पहिला’ हे आपले ध्येय साध्य करण्यासाठी व त्या कार्यात नागरिकांचा व्यापक सहभाग घेण्यासाठी प्रत्येकाने संपूर्ण क्षमतेने काम करावे असे निर्देश आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्वच्छताविषयक आढावा बैठकीप्रसंगी दिले.
0000
