ठाणे : महाराष्ट्र राज्य हे मृद परिक्षण व जमिन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरीता अग्रेसर आहे. राज्यामध्ये सध्या पेरणीला सुरुवात झाली असून डिएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी आहे. चालू खरिप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डिएपी खतावरच अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
कृषी आयुक्तालयाचे कृषी उपसंचालक (खते) संदिप तांबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे की, डिएपी (Di-Ammonium Phosphate) खतामध्ये 18 टक्के नत्र तर 46 टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत. डिएपी खताची कमतरता भरुन काढण्यासाठी पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फुरद युक्त  खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (Single Super Phosphate) या खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत हे देशांतर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद-16 टक्के सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामुळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डिएपीस चांगला पर्याय आहे.
एसएसपी बरोबरच संयुक्त खते जसे की एनपीके-10:26:26, एनपीके-20:20:0:13, एनपीके-12:32:16 व एनपीके-15:15:15 या खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुध्दा पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो. त्याच बरोबर टिएसपी (Tripple Super Phosphate) या खतामध्ये 46 टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा असून डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व टिएसपी एक गोणी खतांचा वापर केल्यास तो देखील डिएपी खतास उत्तम पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ डिएपी खतावरच अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *