अशोक गायकवाड
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या बांधून तयार झालेल्या वास्तू विहित प्रयोजनासाठी वापरात याव्यात असे निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभागांच्या आढावा बैठकीत दिले होते. त्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रातील मार्केटच्या इमारती वापरात येण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांसह मार्केट इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करुन त्या वापरात येण्याच्या दृष्टीने मौलिक सूचना केल्या. सूचना केलेल्या बाबींची तातडीने अंमलबजावणी करुन ही मार्केट तत्परतेने सुरु करावीत असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
यामध्ये दिवाळेगाव येथील मासळी मार्केटची पाहणी करताना आयुक्तांनी तेथील अंतर्गत व परिसर स्वच्छतेवर अधिक भर देण्याच्या सूचना केल्या. त्या ठिकाणी सदयस्थितीत पोर्टेबल स्वरुपाची शौचालये ठेवलेली असून तेथे कायमस्वरुपी शौचालय बांधावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. तेथील भाजीपाला व फळे विक्रीसाठीचे गाळे योग्य विक्रेत्यांना वितरीत करण्याची कार्यवाही तत्परतेने करण्याचेही निर्देशित करण्यात आले. दिवाळेगाव परिसरात विशेषत्वाने खाडी किनाऱ्याच्या भागात तेथील नागरिकांच्या लोकसहभागातून स्वच्छता मोहिम राबवावी अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. यावेळी तेथील विक्रेत्यांशीही आयुक्तांनी संवाद साधला व त्यांचे म्हणणे जाणून घेतले.
से.४, सानपाडा येथील भूखंड क्र.१७ वर महानगरपालिकेने बांधलेल्या दैनंदिन बाजार इमारतीची पाहणी करताना विक्रेत्यांना व ग्राहकांना सोयीचे व्हावे यादृष्टीने तेथील ओटल्यांची रचना काहीशी बदलून ती टेबल स्वरुपाची करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. हे काम तत्परतेने करुन मार्केट त्वरित वापरात आणण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मार्केटच्या आतील भागात हवा खेळती रहावी यादृष्टीने वरील छताचा भाग डिझाईन बिघडू न देता बाहेरच्या बाजूला वेदरशेड सारखा वाढवावा व वरील बाजू हवा येण्या-जाण्यासाठी खुली ठेवावी अशा सूचना करण्यात आल्या. या व सर्वच मार्केटमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेचे संदेश मोठया प्रमाणावर प्रसारित करावेत तसेच सर्व मार्केट्स प्लास्टिक पिशवीमुक्त असावीत असेही आयुक्तांनी निर्देशित केले. अशाचप्रकारे से.१४, सानपाडा येथील मार्केटमध्येही बाहेरच्या बाजूस वेदरशेड करण्याच्या सूचना करुन त्याठिकाणी असलेल्या दुसऱ्या प्रवेशव्दारावरुन नागरिकांना सुलभतेने ये-जा करण्यासाठी तेथे पायऱ्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
वाशी से.१ येथील मार्केटमधील ओटल्यांची रचना बदलण्याचे सूचित करुन आयुक्तांनी त्याठिकाणचेही छत बाहेरच्या बाजूस वाढवून वेदरशेड टाकावी तसेच वरील बाजू हवा खेळती राहण्यासाठी मोकळी ठेवण्याचे निर्देश दिले. या ठिकाणच्या खिडक्यांची रचना बदलण्याच्याही सूचना करण्यात आल्या. नागरिकांना मार्केटमध्ये ये-जा करणे सुलभ व्हावे यादृष्टीने दुसऱ्या बाजूनेही प्रवेशव्दार करण्याचे सूचित करण्यात आले. यावेळी मासळी विक्रेत्यांशी चर्चा करुन त्यांचे म्हणणे आयुक्तांनी जाणून घेतले. या मार्केटच्या अंतर्गत भागातील सुधारणा तत्परतेने करुन घ्याव्यात व मार्केटची इमारत लगेच वापरात आणावी असे निर्देश देण्यात आले. सर्वच मार्केटमध्ये अंतर्भागात पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या छोटया गटारींमध्ये पाणी थांबून राहणार नाही अशाप्रकारे उतार असावा व टाईल्स असाव्यात असेही आयुक्तांनी सूचित केले. वाशी से.९ येथील एनएमएमटी बस टर्मिनस व वाणिज्य संकुल बांधकामाचीही पाहणी आयुक्तांनी करीत येथील बस टर्मिनसमध्ये बसेस आल्यानंतर नागरिकांना ये-जा करताना अडचण होणार नाही अशा प्रकारे बेंचेस बसवावेत व रचना करावी असे निर्देशित केले. याठिकाणी भाडेतत्वावर उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या ऑफिसेस व व्यावसायिक संकुले यांचा वापर लवकरात लवकर सुरु होण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाहीला गती देण्यात यावी अशाही सूचना आयुक्तांनी केल्या. या दौऱ्याच्या अनुषंगाने आयुक्तांनी नवी मुंबई क्षेत्रातील पावसाळी स्थितीचीही पाहणी केली व निदर्शनास आलेल्या बाबींमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या दौ-याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड तसेच परिमंडळ १ चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर, सहा. संचालक नगररचना सोमनाथ केकाण, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
0000
