ठाणे, आंतरराष्ट्रीय योग दिनाचे निमित्त साधून भाजपातर्फे ठाण्यात ३४ ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली. ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’ या संकल्पनेवर झालेल्या कार्यक्रमात शाळकरी विद्यार्थ्यांसह हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.
जागतिक स्तरावर साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे यंदाचे १० वे वर्ष होते. त्यानुसार भाजपातर्फे राज्यभरात प्रत्येक मंडलात योग कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानुसार ठाणे शहरातील सर्व मंडलांबरोबरच एकूण ३४ ठिकाणी कार्यक्रम पार पडले. हिरानंदानी इस्टेटसारख्या उच्चभ्रू वस्तींबरोबर मध्यमवर्गीयांच्या वस्त्यांमधूनही योग कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व वृषाली वाघुले-भोसले यांच्या वतीने बी केबिन येथे वसंतराव नाईक सभागृहात योग प्रशिक्षण दिले गेले. तसेच सहभागी व्यक्तींना मोफत योग मॅट दिल्या गेल्या. हिरानंदानी इस्टेटमध्ये माजी गटनेते मनोहर डुंबरे, माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी रायगड गल्ली, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी यांनी पाचपाखाडीत, मृणाल पेंडसे यांनी ब्राह्रण विद्यालयात, नम्रता कोळी यांनी खारकर आळी, कृष्णा पाटील व नंदा पाटील यांनी वर्धमान हॉल, राजकुमार यादव यांनी इंदिरानगरमध्ये, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील यांनी मनोरमानगरमध्ये, भाजपाच्या ठाणे कार्यालयात सुरज दळवी व राकेश चौगुले यांनी, राम ठाकूर यांनी पानखंडा गावात, उपाध्यक्ष विक्रम भोईर यांनी तपासेनगर, उपाध्यक्ष राजेश गाडे यांनी कोपरीत कार्यक्रम घेतला. त्याचबरोबर भाजपाच्या १२ मंडल अध्यक्षांकडून मंडल स्तरांवरही कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याला आबाल वृद्ध ठाणेकरांचा प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा समृद्ध ठेवा असलेल्या योगसाधनेला जागतिक स्तरावर नेले. स्पर्धात्मक आणि धकाधकीच्या आयुष्यात तणावमुक्त राहण्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्याची आवश्यकता आहे .त्यासाठी योगसाधना गरजेची आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने दररोज योग करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रम भोईर व राजेश गाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
00000
