नवी मुंबई : वटपौर्णिमेचा सण आपल्या सौभाग्याला उदंड आयुष्य लाभावे म्हणून अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त वडाची पूजा करून निसर्गाशी जवळीक साधली जाते. मात्र आजच्या इन्स्टन्ट आधुनिक युगात घरातल्या घरात वटपूजा करण्यासाठी वडाच्या फांद्यांची काही प्रमाणात तोड होताना दिसते. अशाप्रकारे होणारी वृक्षहानी टाळावी आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश प्रसारित व्हावा याकरिता वटपौर्णिमेच्या सणाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महिला कर्मचारी यांनी वृक्षारोपण करून “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश प्रसारित करण्याचे ठरविले आणि 18 वडांचे वृक्षारोपण केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीच्या आवारात महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर आणि उदयान विभागाच्या सहा आयुक्त श्रीम. ऋतुजा गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत 50 हून अधिक महिला कर्मचा-यांनी अत्यंत उत्साहाने वृक्षारोपण केले. आयुर्वेदात अत्यंत महत्वाचा वृक्ष असलेला वटवृक्षाची एकूण 18 रोपाची लागवड करण्यात आली.
वटपौर्णिमेचे औचित्य साधून वृक्षांचे महत्व अधोरेखीत करणारा हा नवी मुंबई महानगरपालिका महिला कर्मचा-यांनी पुढाकार घेऊन राबविलेला अभिनव उपक्रम परंपरा जपत आधुनिकतेशी सांगड घालणा-या स्त्री शक्तीची सर्वसमावेशकता प्रदर्शित करणारा आहे. अशाप्रकारे वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला कर्मचा-यांच्या पर्यावरणप्रेमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
