सागर शिवाजीराव जोंधळे यांची पोलीसांकडील तक्रारीत कारवाईची मागणी

अनिल ठाणेकर

 

ठाणे : गीता खरे व चार साथीदारांनी मिळून शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांची कोट्यवधींची संपत्ती गिळंकृत करण्यासाठी आणि अनैतिक संबंधांतून खून केल्याची तक्रार शिवाजीराव जोंधळे यांचे सुपुत्र सागर शिवाजीराव जोंधळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णुनगर पोलीस ठाणे, डोंबिवली (पश्चिम) येथे दाखल केली आहे. हत्या करण्यापूर्वी  शिवाजीराव जोंथळे यांना, कथीत ब्लु फील्म व्हायरल करण्याची धमकी देवून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आले. तसेच उपचारात ढिलाई करुन त्यांचा गीता खरे, वर्षा प्रीतम देशमुख,  प्रीतम अनिल देशमुख, हर्षकुमार राजेश खरे, स्नेहा हर्षकुमार खरे यांनी मिळून शारिरीक व मानसिक छळ केल्याचाही आरोप सागर शिवाजीराव जोंधळे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
डोंबिवली, कल्याण, आसनगाव परिसरात व महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पाॅलिटेक्निकल काॅलेज उघडून कमर्शियल शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांचे नुकतेच यकृताच्या कर्करोगाने मृत्यु झाला होता. पण आता हा मृत्यु नैसर्गिक नसून त्यांचा गीता खरे व त्यांचे चार साथीदार वर्षा प्रीतम देशमुख,  प्रीतम अनिल देशमुख, हर्षकुमार राजेश खरे, स्नेहा हर्षकुमार खरे यांनी मिळून हत्या केल्याची तक्रार पोलीस उपायुक्तांकडे सागर शिवाजीराव जोंधळे यांनी दाखल केल्याने शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांच्या मृत्युप्रकरणात नवीनच ट्विस्ट आला आहे. सागर शिवाजीराव जोंधळे आपल्या तक्रारीत म्हणतात की, शिवाजीराव जोंथळे यांचा विवाह वैशाली जोंधळे यांच्याशी झाला. त्यांना सागर, देवेंद्र, वैष्णवी व श्वेतांबरी अशी चार अपत्ये आहेत. सागर जोंधळे यांचे आजोबा सखाराम जोंधळे यांनी डोंबिवली येथे समर्थ समाज ट्रस्टच्या माध्यमाने शैक्षणिक संस्था सुरु केली. याचे कामकाज आपले वडील शिवाजीराव जोंधळे हे पहात होते. गीता खरे ही विवाहिता जोंधळे यांच्या संस्थेत शिक्षिका म्हणून  रुजू झाली. त्यावेळी त्यांना हर्षकुमार खरे नावाचे अपत्य होते. कालांतराने गीता खरे व शिवाजीराव जोंधळे यांचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले व या संबंधातुन त्यांना वर्षा देशमुख हे अपत्य झाले. अनैतिक संबंधामुळे शिवाजीराव यांची पत्नी व मुले आणि शिवाजीराव यांच्यात वादविवाद होऊन हे प्रकरण फौजदारी व दिवाणी न्यायालयात गेले. पण शिवाजीराव यांना यकृताचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाल्यावर वाद बाजुला ठेऊन पत्नी व मुलांनी शिवाजीरावांना नामवंत वैद्यकीय इस्पितळात दाखल करुन, शस्त्रक्रियेनंतर ओषधोपचार करुन काळजी घेतली.पण शिवाजीरावांचा उपचार सुरु असतानाच जबरदस्तीने डिस्चार्ज घेऊन गीता खरे व त्यांच्या चार साथीदारांनी शिवाजीरावांना आपल्याकडे नेले आणि पत्नी व मुलांना भेटण्यास मज्जाव केला. याच काळात शिवाजीराव जोंधळे हे आजारपणामुळे मानसिक व शारीरिकदृष्ट्या विकलांग असल्याचा गैरफायदा घेऊन, त्यांची कथीत ब्लु फील्म व्हायरल करण्याची त्यांना धमकी देऊन शिवाजीराव यांच्याकडून आसनगाव व इतर ठिकाणच्या कोट्यावधी रुपये किमतीच्या जमिनींचे बनावट, बेकायदेशीर बश्रीसनत्रे व खरेदीखत करुन घेतले. तसेच प्रत्येकी २०० किलो सोन्याच्या वीटा, ५०० किलो चांदीच्या वीटा व चांदीचे देव, ७५ लाख रुपयांचे हिरे, १ कोटी रुपयांची घड्याळे, २५ लाख रुपयांचे महागातले पेन, ५ लाख रुपयांचे गाॅगल, १० ते १५ लाख  रुपयांच्या दारुच्या बाटल्या, २० ते २५ कोटी रुपयांची रोकड आदी करोडो रुपयांची संपत्ती गिळंकृत केली. गीता खरे व त्यांचे चार साथीदार आपल्या उपचाराबद्दल जाणीवपूर्वक निष्काळजीपणा करीत असल्याचे शिवाजीराव हे सागर गोंधळे यांना सांगत असत. डाॅक्टरांनी शिवाजीरावांना यकृताचे प्रत्यारोपन करण्याचा सल्ला दिला होता. आणि यासाठी सागर जोंधळे यांनी यकृताचा काही भाग दान करण्याची तयारी दाखविली होती. यामुळे शिवाजीराव आनंदी झाले होते. तसेच सागर जोंधळे यांना आसनगाव येथील काॅलेजच्या विघ्नहर्ता ट्रस्टचे अध्यक्ष बनविण्याचे कबूल केले होते. मात्र हे सारे गीता खरे व त्यांच्या चार साथीदारांना कळताच शिवाजीराव यांची करोडो रुपयांची संपत्ती गिळंकृत करता येणार नाही व आपले मनसुबे साध्य होणार नाहीत हे ओळखून डाॅक्टरांचा सल्ला न जुमानता, शिवाजीरावावर यकृत ट्रान्स्फर करण्याची शस्त्रक्रिया त्यांनी होऊ दिली नाही. तसेच उच्च दर्जाच्या रुग्णालयात दाखल न करता त्यांना घरी डांबून ठेवले आणि त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला तसेच कुटूंबिय, नातेवाईक व शाळेतील कर्मचारी यांनी शिवाजीराव यांना भेटू न देता शिवाजीरावांचा मृत्यु घडून यावा, असा सापळा रचला आणि गीता खरे व त्यांच्या चार साथीदारांनी रचलेल्या कटाप्रमाणे अखेर उपचाराअभावी शिवाजीराव जोंधळे यांचा मृत्यु झाला. यामुळे गीता खरे व त्यांच्या चार साथीदारांनी शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांची कोट्यवधींची संपत्ती गिळंकृत करण्यासाठी आणि अनैतिक संबंधांतून खून केल्याची तक्रार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णुनगर पोलीस ठाणे येथे सागर शिवाजीराव जोंधळे यांनी दाखल केली आहे. गीता खरे व त्यांच्या चार साथीदारांवर भा.द.वि. कलम ३०४, ३४७, ३८३, ३८४, ३८७, ४२० अन्वये व सह कलम ३४, १२० (ब) प्रमाणे कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीत त्यांनी केली आहे. तसेच पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त झोन ३ कल्याण यांनाही या तक्रारीच्या प्रती पाठविलेल्या आहेत, अशी माहिती सागर शिवाजीराव जोंधळे यांनी दिली आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *