नीट, युजीसी नेट नंतर १२ तास आधी नीट पीजी
परिक्षाही पेपरफुटीच्या भीतीने रद्द
मुंबई : देशात वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट, युजीसी नेट परिक्षांचे पेपर फुटल्याने विर्द्यार्थी चिंतेत असतानाच आता केंद्र सरकारने परीक्षेला अवघे 12 तास शिल्लक असताना नीट पीजी परीक्षाही रद्द केली आहे. तर पाचच दिवसापुर्वी युजीसी नेट परिक्षा विर्द्यार्थ्यांनी दिल्यानंतर २४ तासात ती पेपर फुटला म्हणून रद्द केली होती. एकुणच सध्या देशात शैक्षणिक आणीबाणी असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
बारा तास आधी नीट पीजी परीक्षा रद्द केल्यामुळे वर्षभर त्याची तयारी केलेल्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे नीट-नेट परीक्षांमधील सरकारच्या भोंगळ कारभारावरुन विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अवघ्या १२ तास आधी परीक्षा रद्द करणे नक्की कशाचे द्योतक आहे ? मुळात अशा प्रवेश परीक्षा राज्य पातळीवर घेण्यात येऊन राज्यांना याबाबतीत अधिक स्वायत्तता दिली जावी. मात्र, केंद्र शासनाला सर्व काही स्वतःच्या हातात ठेवायचे असल्याने या अडचणी उद्भवत आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले. तसेच, या अनागोंदीमुळे उद्विग्न उद्या काही तरुण तरुणींनी टोकाचे निर्णय घेतले तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल, असेही त्यांनी म्हटले. वन नेशन वन इलेक्शनच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला एक परीक्षा नीट घेता येईना, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले.
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा
“मी म्हणेन की या देशात शैक्षणिक आणीबाणी लागू आहे, ज्याप्रमाणे परीक्षा रद्द केल्या जात आहेत, एका पाठोपाठ एक परीक्षा रद्द होत आहेत, पेपर पुढे ढकलले जात आहेत. मात्र, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदारी घेत नाहीत. देशातील नीट परीक्षांच्या चौकशीला त्यांनी नकार दिला आहे. केवळ एनटीए अध्यक्षांची बदली करुन काम झालं का, संपूर्ण शिक्षण विभाग यास जबाबदार असून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा”, अशी मागणी प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.
पेपरफुटीचे धागेदोरे लातूरपर्यंत; सीबीआय कडून FIR दाखल
नीट पेपरफुटी प्रकरणात बिहार कनेक्शननंतर आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी दोन शिक्षकांना नांदेड एटीएसनं ताब्यात घेतलं आहे.
अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकजण लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. दरम्यान, नांदेड एटीएसकडून दोघांचीही कसून चौकशी सुरू आहे. या चौकशी अंती या प्रकरणी आता सीबीआय कडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी या शिक्षकांची नावं आहेत. पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे. लातूरमध्येही नीट आणि जेईईच्या तयारीसाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेत असतात.



