फडणवीसांचं कौतुक, भुजबळांवर टीका
नागपूर : आरक्षणावरून महाराष्ट्रात मराठा विरुध्द ओबीसी वाद चिघळवला जात असताना आता अखिल भारतीय मराठा महासंघाने मनोज जरांगेंच्या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिला आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाला पुढच्या वर्षी 125 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासाठी आज मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक नागपुरात पार पडली. या बैठकीनंतर मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांनी ही माहीती दिली.
आजवर ब्राह्मण नेत्यांकडूनच मराठा समाजाला भरपूर मिळाले, मराठा नेत्यांकडून अपेक्षाभंग झाल्याचंही त्यांनी म्हटलं. आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा वाढवा, ही आमची पूर्वीपासूनची मागणी असून पटेल, जाट, कर्मी, वानियार यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. देशातील नऊ राज्यांत आरक्षणाची मागणी आहे. समाज वंचित असून मर्यादा वाढवली तर सर्वांचे प्रश्न सुटतील. मराठा हे मोठे भाऊ, ज्या लहान भावाला चुकीने का होईना, ताटात काही दिले ते परत घेण्याचे आमच्या ध्येय धोरणात नाही. म्हणून आमची मागणी मर्यादा वाढवणे ही आहे. आम्हाला फडणवीसांनी निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिले आहे. म्हणून आम्ही आमची जी काही खारीची ताकद होती ती भाजपच्या मागे लावली, असे जगताप यांनी म्हटले.
मनोज जरांगे यांना आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे. ते जेव्हा जेव्हा मुंबईला येतात तेव्हा माझ्या कार्यालयात त्यांचा पाहुणचार ठरलेला असतो. दीडशे दोनशे कार्यकर्ते येतात, भेटी होतात. माझे म्हणणे आहे की, ५० टक्क्यांची मर्यादा सुटली की सर्वांचे प्रश्न सुटतील. माझे जरांगे भाऊंना, भुजबळांना आणि हाके बसलेत त्यांना देखील म्हणणे आहे की अरे इथे काय रडता? जो प्रश्न इथे सुटूच शकत नाही. लोकांच्या डोळ्यात धूळफेक करत आहात तुम्ही. राज्य शासनाच्या हातात काही नाही. भुजबळ, हाके, जरांगे आणि मी आणि सगळे राजकीय पक्षांचे नेते म्हणजे शिंदे, अजित दादा सगळ्यांनी मिळून पंतप्रधानांना साकडे घाला. फक्त एक दिवसाचा प्रश्न आहे. आता अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनात एक ठराव पारित करायचा आहे, तो राष्ट्रपतींकडे पाठवायचा आहे, राष्ट्रपतींकडून आला की अध्यादेश काढायचा आहे. मर्यादा पन्नास ऐवजी 75 टक्के वाढवली तर देशातल्या सगळ्या वंचितांना आरक्षण मिळेल. पण काही स्वार्थी राजकारण्यांना तो नको आहे, म्हणून आमच्यात भांडणे लावायला कारण चाललं आहे. पण आम्ही भडकणार नाही, असे जगताप यांनी म्हटले.
काल वडेट्टीवारांनी एवढे अश्रू ढाळले. मात्र, मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच वर्षामध्ये २०० मराठ्यांच्या आत्महत्या झाल्या, तेव्हा हरामखोर कोणी ओबीसीवाला अश्रू ढाळत आला नाही. आठ दिवस झाले हाके उपोषणाला बसले आहेत, तर डोळ्यात अत्तर टाकून आला होता की काय, असा प्रश्न मला त्याला विचारायचा आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाला सांगायचे आहे, की याची ताबडतोब हकालपट्टी करा नाही तर पुढच्या निवडणुकीत समस्त मराठा समाज काँग्रेसच्या विरोधात मतदान करेल, असा इशाराही जगताप यांनी दिली.
छगन भुजबळांबद्दल द्वेष वाटण्याचे कारण शिवसेनेचा बॅनर होता, त्याखाली नव्वद टक्के मराठा होते. त्या मराठ्यांच्या विरोधात ते बोलताहेत म्हणून हा राग आहे, वैयक्तिक काही नाही. त्यांना मोठे करण्यासाठी कित्येकांनी अंगावर केसेस घेतल्या आहेत. गेल्या पन्नास वर्षातला या राजकारणातला मी साक्षीदार आहे, असे म्हणत भुजबळांनाही लक्ष्य केले.
