ज्ञानपीठ पुरस्कारानंतर सर्वाधिक प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून साहित्य अकादमी पुरस्कारांकडे पाहिले जाते. यंदा या पुरस्कारांमध्ये २१ इतर भाषिक तर दोन मराठी साहित्यिक आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांचा तसेच आणि इतरांच्या कपड्याला टाके घालताना युवकांच्या मनाची उसवण करणाऱ्या देविदास सौदागर यांच्या साहित्यकृतींचा या पुरस्काराने सन्मान होणे कौतुकाची बाब ठरली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे आणि तरुण कादंबरीकार देविदास सौदागर यांना यंदाचे साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. सासणे यांच्या ‌‘समशेर आणि भूतबंगला‌’ या कादंबरीला बालसाहित्याचा तर सौदागर यांच्या उसवण या कादंबरीला युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी विविध भाषांमधील साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. सासणे यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंद व्यक्त करणे स्वाभावीक आहे. मूळच्या जालन्याच्या आणि अहमदनगरमध्ये शिक्षण घेतलेल्या सासणे यांचे लेखन अष्टपैलू आहे. त्यांनी ‌‘समशेर आणि भूतबंगला‌’ या कादंबरीतील पात्रे जाणीवपूर्वक निर्माण करून कुमार आणि किशोरवयीन मुलांमध्ये बुद्धिचातुर्य कथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.कादंबरीतील हे पात्र रूजल्याचा आनंद आहे, असे त्यांनी या पुरस्काराच्या निमित्ताने सांगितले. 1980 नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये सासणे हे एक अग्रगण्य आणि महत्त्वाचे नाव बनले आहे. नवकथेची सारी वैशिष्ट्ये आत्मसात करून त्यातून आपला स्वतंत्र बाज निर्माण करणारी कथा सासणे यांनी लिहिली. पारंपरिकता आणि प्रयोगशीलता यांचे मिश्रण त्यांच्या कथांमध्ये आढळते. या कथांमधून व्यक्त होणारे जीवनानुभव हे नावीन्यपूर्ण, असांकेतिक, गूढगहन आणि चमत्कृतीपूर्ण असतात; पण त्यांचे वास्तवाशी घट्ट अनुबंध जुळलेले असतात.
सासणे यांच्या कथांमधून ग्रामीण, आदिवासी, नागर असे समाजजीवनाचे विविध स्तर आणि त्या सामाजिक परिसरात जगणारी, वैशिष्ट्यपूर्ण स्वभावधर्म असणारी नानाविध माणसे भेटतात. मानवी जीवनाची अतर्क्यता व असंगतता, मानवी नातेसंबंधांतील ताणतणाव, व्यक्तीच्या मनोविश्वातील गूढ, व्यामिश्र व अनाकलनीय गुंतागुंत, त्यांचे सूक्ष्म, अनेकपदरी चित्रण करणाऱ्या त्यांच्या कथा स्वाभाविकपणेच दीर्घत्वाकडे झुकतात. अनेकदा या कथांमधून गंभीर, शोकाकूल, व्यामिश्र भावजीवनाचा विलक्षण अस्वस्थ करणारा प्रत्यय येतो. त्यांच्या कथांमधून व्यक्तीच्या आत्मशोधाच्या प्रक्रियेचे चित्रण आढळते. तसेच ते स्त्री-पुरुषांमधील परस्पर आकर्षणामागचे गूढ, तरल, सूक्ष्म मनोव्यापारही कौशल्याने उलगडून दाखवतात. त्यांच्या काही कथांमधून मुस्लिम संस्कृतीच्या छायेत जगणाऱ्या मराठवाड्यातील शहरे आणि व्यक्तींचे सखोल, तपशीलवार चित्रण आढळते. त्यांच्या कथनशैलीत कथाशयाला अनुरूप अशा अन्वर्थक प्रतिमा, प्रतिके, तरल काव्यात्मता, गूढ चमत्कृती (फँटसी) अशा अनेकविध घटकांचा सुसंवादी मेळ साधलेला दिसतो.
आता पुरस्कार मिळालेल्या ‌‘समशेर आणि भूतबंगला‌’ या कादंबरीतील आपला मित्र समशेर कुलुपघरे उर्फ ‌‘शेरलॉक होम्स‌’ सुट्टीमध्ये मित्राच्या, नीलेशच्या घरी राहायला आला आहे आणि तो एकटा नाही, तर सगळी टीमच आहे त्याच्याबरोबर. सुट्टीमध्ये धमाल करायचा त्यांचा विचार; पण नीलेशच्या राहत्या ऐतिहासिक वाड्यात आप्पासाहेबांना चक्क भूत दिसले आहे. एक नाही, दोन नाही, तर तीन-तीन भुते दिसली आहेत. एक हवेत तरंगते, एक उंचाड खिडकीतून दिसते तर तिसरे मेणबत्तीवाले भूत आहे. भुते नसतात असे समशेरचे म्हणणे; पण ही भुते पाहिल्याचे सांगणारे साक्षीदार तर अनेक आहेत. समशेर नाईलाजाने या तपासकथेत ओढला जातो आणि मग सुरू होतो पहिला रोमांचकारी तपास. समशेरचा दुसरा तपास असाच असतो, मोतीच्या शोधाचा. समशेरचा मित्र गंपूच्या कुत्र्याचे नाव मोती! हा मोती सर्वांचा लाडका! आणि तोच नाहीसा झालाय. कुणी तरी त्याला पळवून नेले आहे. गंपूने तर मोती सापडेपर्यंत अन्न-पाणी न घेण्याची प्रतिज्ञाच केली आहे. मग सुरू होतो समशेर आणि मित्रमंडळींचा तपास.
तिसऱ्या प्रकरणात एक दुर्मीळ असे लपवून ठेवलेले पोस्टाचे तिकिट त्याला शोधून काढायचे आहे. तो या प्रकरणांमध्ये यशस्वी होतो का हे जाणून घेण्यासाठी समशेरच्या बुद्धिचातुर्य साहसकथा वाचाव्या लागतील .
सुनंदाताईला एक लांब मिशीवाला माणूस रोज दिसतो. आश्चर्य म्हणजे हा माणूस तिला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो. एकच माणूस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी पुन्हा पुन्हा कसा काय दिसेल, असा सगळ्यांचा सवाल. त्यामुळे बिचाऱ्या सुनंदाताईवर कोणी विश्वासच ठेवत नाही; पण पाहुणा म्हणून आलेल्या एक मुलगा मात्र तिला खणखणीत आवाजात सांगतो की ताई, माझा तुझ्यावर विश्वास आहे. या मुलाचं नाव समशेर कुलुपघरे. येथून सुरू होतो रोमांचकारी शोधाचा प्रवास. आणि या वेळेस चाळीस मिनिटातच एक राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकरणाचे कोडे सोडवायचे अवघड आव्हान समशेरला स्वीकारावं लागलेले असते… घोड्याचे रहस्यही असेच अफलातूनच. सगळ्यांची मती गुंग करणारे; पण समशेर या रहस्यांकडे वेगळ्याच नजरेने पाहतो आहे. सुटेल त्याला हे कोडे? जाणून घेण्यासाठी वाचाव्या लागतील समशेरच्या या तीन कथा.
आणखी एका कथेमध्ये परग्रहावरून काही रहस्यमय जीव शहरात आले आहेत, अशी बातमी वेगाने पसरते. त्यामुळे शहरात भयाचे वातावरण आहे. त्यातून, सुनंदाताईंच्या मामांनाच ही परग्रहावरची माणसे म्हणजे ‌‘एलियन्स‌’ दिसली आहेत आणि म्हणूनच आपला समशेर त्याच्या सगळ्या ‌‘टीम‌’सह या प्रकरणात ओढला गेला आहे. समशेर  हे रहस्य कसे सोडवतो? केवळ लॅपटॉपवर काही मिनिटांची चित्रफित पाहून समशेर मती गुंग करणारे कोडे सोडवून नंदूभय्याला मदत करतो. तिसऱ्या एका प्रकरणात अंध संगीतकार श्रीपदराव यांच्या अंगठीची अदलाबदल झाली आहे. आता ही अदलाबदल कोणी केली असेल, हे वाचायला हवे. बालसाहित्यामध्ये मराठी ज्ञानदा असोलकर यांचा अंबेवाले लोक, फारुक काझी यांचे छुटकीचे जग, कैलास दौंड यांची जाणीवांची फुले, गणेश घुले यांची सुंदर माझी शाळा यासह एकूण आठ पुस्तके स्पर्धेत होती; मात्र त्यातून सासणे यांच्या ‌‘समशेर आणि भूतबंगला‌’ची निवड करण्यात आली.
तुळजापूरचे लेखक देविदास सौदागर यांच्या ‌‘उसवण‌’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला. सौदागर हे कवी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. ही कादंबरी टेलरिंग व्यवसायातले चटके वाचकांसमोर ठेवते. शिलाई कामगार आणि शिलाई व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची व्यथा आणि संघर्ष त्यांनी ‌‘उसवण‌’ या कादंबरीतून मांडला आहे. तिला अखिल भारतीय श्रेणीचा साहित्य पुरस्कार मिळाल्याने दोन पिढ्यांचा संघर्ष आणि टाळेबंदीनंतर निर्माण झालेली परिस्थिती याची नोंद घेतली गेल्याचं समाधान वाटते, असे ते म्हणतात. त्यांचा कपडे शिलाईचा व्यवसाय आहे. कोरोनाकाळात हा व्यवसायही बंद करावा लागला होता. तोच संघर्ष सौदागर यांनी ‌‘उसवण‌’ कादंबरीतून मांडला आहे.
रेडिमेड कपड्यांच्या दुनियेमध्ये शिलाई काम करणाऱ्या कामगारांची झालेली होरपळ, या कामगारांवर आलेले आर्थिक संकट, त्यामधून निर्माण झालेले कौटुंबिक प्रश्न याला या कादंबरीतून वाचा फोडली गेली आहे. ही कादंबरी परंपरागत शिलाई व्यवसाय आज कोणत्या स्थितीमध्ये आहे, याचे दर्शन घडवते. परंपरागत शिलाई काम करून ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अलीकडच्या काळात रेडीमेड कपडे वापरणे तसेच रेडिमेड कपड्याची मोठी बाजारपेठ उभी राहिल्यामुळे कपडे शिवण्याचा व्यवसाय अडचणीत आला आहे. कोरोनाच्या संकटकाळात तर दुकानाचे भाडे देणेदेखील कठीण झाल्यामुळे तुळजापूर शहरामधील मंगळवार पेठ येथे असलेला ‌‘सौदागर टेलर्स‌’ नावाचा आपला व्यवसाय बंद करावा लागला होता, याची आठवण त्यांनी सांगितली. २०१८ मध्ये ‌‘कर्णाच्या मनातलं‌’, हा कवितासंग्रह, २०२१ मध्ये ‌‘काळजात लेणं कोरताना‌’ हा कवितासंग्रह तर २०२२ मध्ये ‌‘उसवण‌’ ही कादंबरी अशी सौदागर यांची साहित्यसंपदा आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *