पालघर : महावितरणच्या कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून श्री. चंद्रमणि मिश्रा यांनी पदोन्नतीवर सोमवारी (दि. २४) कार्यभार स्वीकारला. याआधीचे मुख्य अभियंता श्री. धनंजय औंढेकर यांची मुंबईतील बांद्रा येथील मुख्य कार्यालयात समकक्ष पदावर बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त जागी श्री.मिश्रा रुजू झाले आहेत.
मुख्य अभियंता श्री. चंद्रमणि मिश्रा हे मूळचे मुंबईचे रहिवासी आहेत. त्यांनी विद्युत अभियांत्रिकी पदवी जयपूर एनआयटी येथून विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली आहे. तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून ते सन जुलै २००३ मध्ये अलिबाग येथे रूजू झाले. त्यानंतर थेट भरतीद्वारे त्यांनी सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता पदी काम केले. सन २००९ मध्ये थेट भरती प्रक्रियेमधून त्यांची कार्यकारी अभियंता पदी निवड झाली. या काळात त्यांनी वाशी, औरंगाबाद व मुख्य कार्यालयात काम केले आहे. त्यानंतर पदोन्नतीवर सन २०१८ पासून अधीक्षक अभियंता म्हणून मुख्य कार्यालयातील विशेष प्रकल्प विभागात त्यांनी उल्लेखनिय कामगिरी केली आहे.  नुकतीच त्यांना मुख्य अभियंता पदी पदोन्नती मिळाली.
श्री. चंद्रमणि मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली सन २०१९ ते २०२२ या कालावधीत मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत राज्यात शेतकऱ्यासांठी एक लाख सौर कृषिपंप कार्यान्वित झाले. तसेच सौर ऊर्जा निर्मितीचे एक हजार २३० मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प पूर्ण झाले. त्यांच्याच नेतृत्वाखाली सोलर रुफ टॉप आणि ईव्ही चार्जिन्ग स्टेशन उभारणीच्या विशेष कामगिरीबाबत महावितरणला विविध पुरस्काराने गौरवण्यात आले.
कल्याण परिमंडलामध्ये लोकाभिमुख प्रशासनातून उत्कृष्ट व तत्पर ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल तसेच वीज गळती कमी करून महावितरणच्या महसूलवाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्य अभियंता श्री. चंद्रमणि मिश्रा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *