लक्षवेधी

प्रा. डॉ. विजयकुमार पोटे

चित्रदुर्गमधील रेणुका स्वामीला फिल्मस्टार दर्शन खूप आवडायचा. मात्र त्याच्या वैवाहिक जीवनात आलेल्या पवित्राचा राग यायचा. तो पवित्राला ‌‘सोशल मीडिया‌’वर गलिच्छ मेसेज पाठवायचा. मात्र या सवयीमुळे दर्शन इतका चिडला की त्याने आपल्या फॅन्सना त्याला मारण्याची सुपारी दिली. प्रथितयश कलाकाराने इतक्या खालच्या पातळीवर उतरुन इतके घृणास्पद कृत्य करावे, यावरुन समाज कोणत्या थराला चालला आहे, हे स्पष्ट व्हावे.

दक्षिण भारतात चित्रपटांची वेगळीच क्रेझ पहायला मिळते. लोक केवळ फिल्म स्टार्सवर प्रेमच करत नाहीत, तर अनेकजण त्यांची देवाप्रमाणे पूजा करतात. चित्रदुर्गमधील एका मेडिकल स्टोअरचा सेल्समन रेणुका स्वामी याचाही चित्रपट स्टार दर्शन तुगुडेपा याच्यावर असाच जीव होता. अशा परिस्थितीत दर्शनच्या स्नेह्यांनी रेणुकाला दर्शनला त्याला भेटायचे आहे असे सांगितले तेव्हा त्याचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना. देवाने आपली इच्छा पूर्ण केली, असे त्याला वाटले; पण ज्याला देव समजतो, तो सैतान आहे हे त्याला माहीत नव्हते. त्यामुळेच एक आक्रीत घडले. त्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.
चित्रदुर्गमधील अपोलो फार्मसीमध्ये काम करणाऱ्या रेणुका स्वामीला फिल्मस्टार दर्शन खूप आवडायचा. दर्शनचा प्रत्येक चित्रपट तो ‌‘फर्स्ट डे फर्स्ट शो‌’ पहायचा. पवित्रा गौडा हिने दर्शनच्या वैवाहिक जीवनात प्रवेश केला, तेव्हा त्याला पवित्राचा राग येऊ लागला; मात्र दर्शन किंवा पवित्रा यांना ते माहीत नव्हते. दोघांच्याही आयुष्यात त्यांची स्थिती एका सामान्य चाहत्यापेक्षा जास्त काही नव्हती. दर्शन आणि पवित्रा रेणुकाला ओळखतही नव्हते. रेणुका झोपडीत राहायचा. पवित्रा गौडा यांना ‌‘सोशल मीडिया‌’वर अनेकदा गलिच्छ मेसेज पाठवायचा. रेणुकाने पवित्राला ‌‘सोशल मीडिया‌’वर घाणेरडे मेसेज पाठवणे, दर्शनच्या आयुष्यातून दूर जाण्यास सांगणे हे आपल्या जीवावर बेतेल, हे त्याला माहीत नव्हते. या सवयीमुळे त्याचा आवडता नायक त्याच्यावर इतका चिडला की त्याने आपल्या फॅन्सना त्याला मारण्याची सुपारी दिली. चित्रदुर्गमध्ये दर्शनचा फॅन क्लब चालवणाऱ्या राघवेंद्रने 8 जून रोजी रेणुकाला फोन करून दर्शनची भेट घेण्याची संधी आहे, असे सांगितले तेव्हा रेणुकास्वामीने आनंदाने उड्याच मारल्या. त्याच क्षणी तो आपल्या आवडत्या फिल्म स्टारला भेटण्यासाठी त्याच्यासोबत जायला तयार झाला. गेल्या अनेक दिवसांपासून दर्शनचे हे काही कारस्थानी फॅन रेणुकाला शोधण्याचा प्रयत्न करत होते. दर्शनला भेटण्याच्या आमिषाने तो अलगद जाळ्यात अडकला. राघवेंद्रच्या सूचनेनुसार तो स्कूटरवरून चित्रदुर्गातील चल्लाकेरे भागात पोहोचला आणि राघवेंद्र याची भेट घेऊन दर्शनच्या भेटीसाठी बंगळुरूला जाण्यास तयार झाला. त्याने कॅब बुक केली. रेणुका राघवेंद्रच्या काही मित्रांसह स्वामीसोबत बंगळुरूला रवाना झाला. वाटेत त्याला इतर फॅन्सही भेटले. त्यांनी रेणुकाला थेट बेंगळुरूच्या पट्टनाग्रे भागातील शेडमध्ये नेले. तिथे त्याचा काही तास छळ करून मारण्यात आले. त्याच्या हत्येच्या तपासात आता या कटाबद्दल समोर आलेले तथ्य धक्कादायक आहे.
राघवेंद्र आणि अन्य फॅन्सनी चित्रदुर्गमधून रेणुकास्वामीचे अपहरण केले आणि खून केला. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही गोळा केले. त्यात राघवेंद्र आणि रेणुका दोघे दिसत आहेत. चित्रदुर्गमधून रेणुकाचे अपहरण करण्यात राघवेंद्रला मदत करणाऱ्या अशा आणखी काहीजणांचा पोलिस अजूनही शोध घेत आहेत. ज्याची देवासारखी पूजा केली, त्याच्या समर्थकांनीच या भक्ताला बेदम मारहाण केली. त्याचा स्वतःपेक्षा दर्शनवर जास्त विश्वास होता; पण इथे दर्शनच्या सांगण्यावरून काही गुंडांनी त्याला मारण्याचा बेत आखला. त्याला बंगळुरूमधील एका निर्जन ठिकाणी मारहाण करुन गरम लोखंडी रॉडने डाग देऊन इतर प्रकारची क्रूरता करण्यात आली. दर्शन हा रेणुकासंदर्भात सतत फॅन क्लब सदस्यांच्या संपर्कात होता. रेणुकाला बंगळुरूला आणल्याची बातमी मिळाल्यावर तो स्वत: त्याला ओलिस ठेवलेल्या ठिकाणी लपून बसला. येथे पोहोचल्यानंतर त्याने प्रथम रेणुकाला बेल्टने मारहाण केली. आता शवविच्छेदन अहवालातील गौप्यस्फोटांनी या प्रकरणाची दिशाच बदलून टाकली. रेणुकाला बेदम मारहाण केल्यावर समाधान झाल्यानंतर दर्शन तिथून परत गेला आणि आपल्या चाहत्यांना त्याला मारण्याचा आदेश दिला. यानंतरही बराच काळ त्याच्यावर अत्याचार सुरूच राहिले आणि शेवटी त्याला आपला जीव गमवावा लागला.
रेणुकाचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना त्याच्या शरीरावर गरम लोखंडी रॉडने चटके दिल्याच्या खुणा आढळल्या. त्याचे नाक, जीभ कापण्यात आली आणि जबडाही तुटून वेगळा करण्यात आला. यासोबतच शरीरातील असंख्य हाडे तुटली होती. तो एखाद्या भिंतीवर आदळल्यासारखा वाटत होता. त्याच्या कवटीवर फ्रॅक्चरच्या खुणा आढळल्या. रेणुकाच्या मृतदेहाचे विच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी हे प्रकरण उघड केले, अन्यथा बंगळुरू पोलिस सुरुवातीला हे आत्महत्येचे प्रकरण मानत होते. पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणाप्रमाणेच हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दडपण्याचा प्रयत्न दर्शन आणि त्याच्या फॅन्सकडून सुरू झाला. रेणुका स्वामीच्या मृतदेहाचे विच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या एका टीमला त्याचा मृत्यू सामान्य घोषित करण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती. यासोबतच रेणुका याचा मृत्यू हत्येऐवजी नैसर्गिक असल्याचे जाहीर करावे, असेही सांगण्यात आले. डॉक्टरांनी लाच न घेता काम केले. डॉक्टरच्या या तक्रारीने कर्नाटकमध्ये भूकंप घडवला. पोलिसांनी डॉक्टरांना या प्रकरणी तक्रार देण्यास सांगितले.
पोलिस तपासात एक गौप्यस्फोट झाला आहे. रेणुका स्वामीची हत्या केल्यानंतर खुद्द खुन्याने त्याच्या ओळखीच्या पोलिस उपनिरीक्षकाला फोन करून रेणुकाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना विचारली होती. ही कल्पना त्या पोलिस उपनिरीक्षकाची होती. त्यानंतर नराधमांनी रेणुकाचा मृतदेह कामाक्षिपाल्य येथील गलिच्छ नाल्यात फेकून दिला. कारण पावसानंतर गलिच्छ नाल्यात फेकलेला रेणुकाचा मृतदेह वाहून जाईल आणि कोणाला कळणार नाही, असे त्यांना वाटत होते; मात्र दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी म्हणजे नऊ जून रोजी त्याचा मृतदेह भटक्या कुत्र्यांनी ओरबाडलेला दिसला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरला लाच देण्याचा प्रयत्न, पोलिस उपनिरीक्षकाला मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची विचारणा या गोष्टी कमी होत्या की काय म्हणून कर्नाटकच्या एका राज्यमंत्र्यानेच दर्शनला वाचवण्याचा प्रयत्न केला. रेणुका हत्येप्रकरणी पोलिसांनी दर्शनला म्हैसूरमधील हॉटेलमधून ताब्यात घेतले तेव्हा या मंत्र्याने बंगळुरूच्या उच्च पोलिस अधिकाऱ्यांनाच नव्हे, तर गृहमंत्र्यांनाही फोन केला आणि मुख्यमंत्री कार्यालयाशीही संपर्क साधला. हे मंत्री स्वतः त्यांना भेटण्यासाठी गेल्याने हद्द झाली; मात्र या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्र्यांनी या प्रकरणी आपल्यावर कोणाचाही दबाव नसल्याचे स्पष्ट केले.
दर्शनला अटक होताच सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाचे नेते सक्रिय झाले आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. या लोकांमध्ये भाजपच्या एका आमदाराचे नावही समोर आले. त्याने दर्शनला अटक केल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोलून प्रकरण शांत करण्यासाठी दबाव टाकला होता; परंतु सततच्या मीडिया रिपोर्टसच्या पार्श्वभूमीवर कोणाच्याही दबावाखाली पोलिसांनी काम केले नाही. पोलिसांनी अद्याप या प्रकरणातील चालू तपासातील सर्व तपशील उघड केलेले नाहीत; परंतु त्यांनी दर्शनला आरोपी क्रमांक एक नाही तर आरोपी क्रमांक दोन बनवले आहे. त्याची दुसरी पत्नी पवित्रा गौडा आरोपी क्रमांक एक आहे, जिच्याशी हे संपूर्ण प्रकरण संबंधित आहे. कर्नाटकमधील या रेणुका स्वामी हत्या प्रकरणाची देशभरात चर्चा आहे. कारण कन्नड अभिनेता दर्शनचे नाव त्याच्याशी जोडलेले आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याला आणि त्याच्या सहकलाकार मैत्रिणीसह सुमारे 15 जणांना अटक केली आहे. घटनेच्या तारखेचे लोकेशन तपासले असता आरोपी आणि दर्शनचे लोकेशन एकच असल्याचे निष्पन्न झाले. दर्शन हा या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे निष्पन्न झाले. या कामासाठी दर्शनने संबंधितांना 30 लाख रुपये दिल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी 30 लाख रुपयांच्या व्यवहारांचा तपशील काढला आहे. दर्शनने 2002 मध्ये ‌‘मॅजेस्टिक‌’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. कारिया, क्रांतीवीर सांगोली रायण्णा, कलासिपल्य, गजा, नवग्रह, सारथी, बुलबुल, यजमना, रॉबर्ट आणि कटेरा यासह अनेक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे.
अशा या प्रथितयश कलाकाराने इतक्या खालच्या पातळीवर उतरुन इतके घृणास्पद कृत्य करावे, यावरुन समाज कोणत्या थराला चालला आहे, हे स्पष्ट होतेच, पण मानवतेची होत असलेली अधोगतीही चिंता वाटायला लावणारी आहे.
(अद्वैत फीचर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *