डोंबिवली :  येथील के.व्ही. पेंढरकर हे कॉलेज विनाअनुदानित करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. याविरोधात कॉलेजमधील शिक्षक व माजी विद्यार्थी गेल्या आठवड्याभरापासून साखळी उपोषणास बसले आहेत. याकडे शासन लक्ष देत नसल्याने येत्या कोकण पदवीधर मतदानावर  बहिष्कार टाकण्याचा निर्णय येथील पदवीधर शिक्षक व विद्यार्थ्यांनी घेतला.
डोंबिवलीतील के.व्ही.पेंढरकर कॉलेज हे विनाअनुदानित करण्याचा घाट घातला आहे. त्याला सरकारी मान्यता नाही, मान्यता नसताना तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना महाविद्यालय प्रशासनाकडून विनाअनुदानित प्रक्रिया राबविणे सुरू आहे हे चुकीचे असून यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. असे म्हणत पेंढरकर कॉलेज विनाअनुदानित करण्याचे विरोधात येथील शिक्षक आणि माजी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
गेल्या आठवड्याभरा पासून कॉलेजच्या बाहेर हे विद्यार्थी व शिक्षक साखळी आंदोलन करत आहेत. राजकीय पदाधिकारी त्यांच्या भेटीला येऊन गेले आहेत मात्र त्यावर काही ही तोडगा निघालेला नाही. येत्या 26 जूनला विधान परिषदेच्या  रिक्त जागांसाठी मतदान होत आहे. यात कोकण पदवीधर मतदार संघासाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सेव्ह पेंढरकर संघटनेच्या पदवीधरांनी घेतला आहे.
‘मी पदवीधर ‘मतदार’, माझा मतदानावर ‘बहिष्कार”
अशा आशयाचे बॅनर डोंबिवलीत बेमुदत उपोषण करण्याऱ्या माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी लावले आहेत. सुमारे 51 शिक्षक आणि 500 च्या आसपास माजी विद्यार्थी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती यावेळी सत्यवान म्हात्रे यांनी दिली.याविषयी बाळासाहेब लाहोर म्हणाले, पेंढारकर कॉलेज डोंबिवलीतील पहिल अनुदानित कॉलेज आहे. हे कॉलेज विनाअनुदानित तत्त्वावर चालविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासकीय पातळीवर गेल्या एक वर्षापासून आम्ही पत्रव्यवहार करूनही त्याबाबत अद्याप कोणतेही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
जर हे कॉलेज विनाअनुदानित केल तर येथील कामगार, शिक्षक आणि पुढील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे मुश्किल होणार आहे. हे कॉलेज अनुदानित रहावे यासाठी शासन स्तरावर जोपर्यंत काही कार्यवाही होत नाही तोपर्यंत पुढील कोणत्याही निवडणूकित मतदान न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. येत्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकत मतदान न करण्याचे आम्ही ठरविले आहे असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *