मुंबई: विधानसभेचे पडघम राज्यात वाजू लागलेत. आरोप प्रत्यारोपांना सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहीत पवार यांनी येत्या दोन दिवसात मोठा धमाका करणार असल्याचे सुतोवाच केल्याने राजकीय वर्तुळात त्याची चर्चा सुरु झाली आहे.

येत्या पावसाळी अधिवेशनात हा धमाका रोहीत पवार करणार आहेत. आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करत ‘राज्याला हादरवून सोडणारा मोठा खुलासा दोन दिवसांत करणार’ असं म्हटलं आहे. तसेच ‘दोन दिवस थांबा फार मोठा स्फोट आहे’, असं सूचक विधानही रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केलं.

“दोन दिवस थांबा, फार मोठा स्फोट आहे. त्यामध्ये असं म्हटलं जात आहे की, ५ हजार कोटींपेक्षा जास्त कमिशनचा तो विषय आहे. त्याबाबतीत सविस्तर ट्विट मी नक्कीच करेन. जो खुलासा मी करणार आहे. त्यामध्ये विविध खाते आहेत. त्या विविध खात्यांचे…दोन दिवस थांबा”, असं सूचक विधान रोहित पवार यांनी आज केलं.

 

“गेली दोन अडीच वर्षे सत्ताधाऱ्यांनी कमिशनखोरी करण्याव्यतिरिक्त कुठेही दिवे लावलेले नाहीत. त्यामुळे जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष आहे आणि हा रोष लोकसभेलाही दिसून आला. तसाच विधानसभेतही दिसणार आहे. आता निवडणुका जवळ येत असल्याने आम्ही काहीतरी केले हे कसे दाखवावे या विवंचनेतून सत्ताधारी आमदारांना येणाऱ्या अधिवेशनात भरीव निधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण निधी देणार कुठून? हा प्रश्न अर्थमंत्र्यांना आणि अर्थमंत्र्यांची फाईल ज्यांच्या सहिने पास होते त्या गृहमंत्र्यांना पडतो की नाही? सरकारच्या याच उधळपट्टीमुळे राज्याच्या तिजोरीत निधीचा खडखडाट झाला असून यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाची २० हजार कोटींची बिले अद्यापही थकीत आहेत. सरकार बिले देत नसल्याने तर राज्यातीलल बहुतांश कामेही थांबली आहे. अशी स्थिती असताना आणखी कमिशन खाण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांना, आमदारांना खूष करण्यासाठी नवीन कामांना निधी देण्याचा घाट घातला जात आहे का? यासाठी पुन्हा नव्याने हजारो कोटींची कर्जे काढली जातील, हे सरकार पुन्हा सत्तेत तर येणार नाही. मात्र जाता जाता राज्याच्या तिजोरीची पूर्णपणे वाट लावून जाईल, हे मात्र नक्की आहे. यासंदर्भात राज्याची तिजोरी कुरतडणारा राज्याला हादरवून सोडणारा मोठा खुलासा येत्या दोन दिवसात करणार आहे”, असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *