ठाण्यात खड्ड्यांचे विघ्न, पावसात मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी

 

ठाणे : गेल्यावर्षी पावसाळ्यानंतर डागडुजी करण्यात आलेल्या ठाणे, घोडबंदर आणि खारेगाव भागांतील महामार्गासह उड्डाणपुलांवर यंदा पहिल्याच पावसात मोठे खड्डे पडले. यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांच्या भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. ठाणे शहराकडे शासनाच्या संबंधित विभागांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, यात ठाणे महालिका प्रशासन टीकेची धनी ठरली आहे.
ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा या उद्देशातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेला ६०५ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनामार्फत दिला. यातून शहराच्या अंतर्गत भागातील अनेक रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात आले. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात शहराअंतर्गत रस्ते सुस्थितीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. असे असले तरी दरवर्षी प्रमाणे यंदाही ठाणे आणि घोडबंदर भागातून जाणाऱ्या महामार्गासह उड्डाणपुलांवर खड्डे पडले आहेत.
या मार्गावर गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात खड्डे पडले होते. या खड्डे प्रवासाबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर या मार्गाची डागडुजी करण्यात आल्याने यंदाच्या पावसाळ्यात महामार्गावरून खड्डेमुक्त प्रवास होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. महापालिका क्षेत्रातील कोपरी उड्डाणपुल, तीनहात नाका उड्डाणपुल हे एमएमआरडीए, नितीन कंपनी उड्डाणपुल एमएसआरडीसी, माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, वाघबीळ उड्डाणपुल हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात. या सर्वच विभागांनी गेल्यावर्षी रस्त्यांची डागडुजी केली होती. या रस्त्यांवर पहिल्याच पावसात खड्डे पडल्याचे दिसून येत आहे.
माजिवाडा, कॅडबरी आणि नितीन कंपनी, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ या पुलांवर खड्डे पडले आहेत. या मार्गांवर अवजड, हलक्या तसेच इतर वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. मात्र, खड्ड्यांमुळे वाहनांच्या वेगावर परिणाम होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने ते चालकांना दिसत नाहीत. यामुळे वाहन आदळते. तसेच काही ठिकाणी मोठे खड्डे आहेत. तिथे स्कूटरचे चाक अडकून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एम. पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
कोंडीची कारणे
मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव भागात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे. हा रस्ता काँक्रीटचा केला जात आहे. रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरु आहे. सेवा रस्ता किंवा मुख्य रस्त्या लगतच्या रुंदीकरणातील भागात काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण अद्याप झालेले नाही. त्यामुळे मुख्य रस्ता आणि नव्याने तयार करण्यात आलेला रस्ता उंच-सखल झाला आहे. यामुळे वाहन चालविताना चालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात घडत आहेत. तसेच वाहतुकही या भागात संथ होऊ लागली आहे.
उरण जेएनपीटी बंदरातून येणारी हजारो अवजड वाहने मुंबई नाशिकच्या दिशेने वाहतुक करण्यासाठी मुंब्रा बाह्यवळण मार्गाने वाहतुक करतात. खारेगाव टोल नाका येथे खड्डे पडल्यामुळे येथे वाहतुक काहीवेळ थांबवून टप्प्याटप्प्याने सोडली जात आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा मुंब्रा बाह्यवळण मार्गापर्यंत जात आहेत.
वाहतूक संथगती
सोमवारी मुंबई नाशिक महामार्गावर अवजड वाहने बंद पडल्याने मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव, मुंब्रा बाह्यवळण महामार्ग, पिंपळास भागात वाहतूक कोंडी झाली होती. या भागात मुख्य मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे देखील वाहतूक संथ सुरू होती. तसेच माजिवाडा आणि कापूरबावडी भागातही कोंडी झाली होती.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *