एक आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुणे : पुण्यातील L3 लॉऊन्ज पबमध्ये ड्रग्जची पार्टी करणाऱ्या दोन्ही तरुणांची ओळख पटली असून त्यापैकी एक तरुण मुंबईकर आहे तर दुसऱा पुण्यातील मुंढवा येथे रहाणारा आहे. त्यापैकी एक आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. या दोन्ही तरुणांनी ड्रग्जचं सेवन केल्याची कबुली दिली आहे.
पुण्यातील एफसी रोडवरील L3 बार मधील एक व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओमध्ये दोन तरूण ड्रग्ज घेत असल्याचं दिसत होतं. या व्हिडीओनंतर पोलिसांनी दोघांचा तपास घेत त्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्या चौकशीदरम्यान त्यांनी ड्रग्ज सेवन केल्याची कबुली दिली. त्यामुळे L3 लाउंज पबमध्ये ड्रग्ज घेतले जात होते यावर शिक्कामोर्तब झालं.
मुंबईत राहणारा तरूण हा आर्किटेक्ट आहे आणि तो मेफेड्रॉन घेऊन पुण्यात आला होता. तर दुसरा तरूण हा पुण्यातील मुंढव्यातील असून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. या दोघांची ओळख एका पार्टीमध्ये झाली होती.
हे दोघे शनिवारी संध्याकाळी एकत्र आले आणि रात्री एल थ्री या पबमध्ये गेले. हे दोघे द कल्ट या पबमध्ये आधी झालेल्या पार्टीत सहभागी झाले नव्हते. द कल्ट या पबच्या मालकावर देखील पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला द कल्ट या पबमध्ये पार्टी झाली आणि नंतर मध्यरात्री दीडनंतर पुढची पार्टी ही एल थ्रीमध्ये सुरू झाली.
यातील एका तरूणाला मुंबईतून अटक करण्यात आली तेव्हा त्याच्याकडे पाच ग्रॅम मेफेड्रॉन आढळून आले. हे मेफेड्रॉन त्यानं मुंबईतून खरेदी केले होते. त्यामुळे पुण्यासोबतच मुंबईमध्येही मेफेड्रॉन ड्रग्जची विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता पुणे पोलिसांसोबत मुंबई पोलिसांकडूनही केला जाण्याची शक्यता आहे.
