विश्लेषण

राही भिडे

…अखेर प्रियांका गांधी सक्रीय राजकारणात आल्याच! त्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरत आहेत. काँग्रेसच्या महासचिव आणि कथित संकटमोचक प्रियांका गांधी-नेहरू परिवारातील संसदीय राजकारणात येणाऱ्या दहाव्या सदस्य आहेत. अलिकडेच उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र आल्याने काँग्रेसची ताकद वाढली आहे. वायनाडमधून प्रियांका गांधींना निवडून आणून काँग्रेस नवा डाव खेळू पहात आहे.

दोन लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी नियमानुसार एका, म्हणजेच वायनाड लोकसभा मतदारसंघातील सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. ही घटना निश्चितच एका वेगळ्या राजकीय समीकरणाला गती देणारी आहे. आता वायनाड लोकसभा मतदारसंघातून प्रियांका गांधी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. केरळमधील राजकीय वातावरण पाहता त्या तेथून निवडून येण्यात कोणतीही अडचण नाही. काँग्रेसच्या महासचिव असणाऱ्या आणि संकटमोचक म्हणून काम करणाऱ्या प्रियांका आता प्रत्यक्षात संसदीय राजकारणात येत आहेत. गांधी-नेहरू परिवारातील संसदीय राजकारणात येणाऱ्या त्या दहाव्या सदस्य आहेत. त्या भिस्त ठेवून असणाऱ्या दक्षिण भारतात काँग्रेस प्रबळ होती. उत्तर भारतात तिचे अस्तित्त्व फार नव्हते. मात्र उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र आल्याने या वेळी तेथील जागा वाढल्या आहेत. रायबरेलीची जागा ठेवून वायनाडचा राजीनामा द्यायचा आणि तिथून प्रियांका यांना निवडून आणून दक्षिण आणि उत्तर भारतात काँग्रेसचा पाया अधिक मजबूत करायचा, असा हेतू त्यामागे आहे.
वायनाडची जागा सोडून देशातील सर्वात मोठे राज्य असणारे उत्तर प्रदेश आपलेसे करण्याचा राहुल यांचा प्रयत्न आहे. उत्तर प्रदेशमधील गमावलेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी यापेक्षा दुसरी चांगली संधी नसल्याचे गांधी घराण्याला माहीत आहे. लोकसभा निवडणुकीत ‌‘इंडिया‌’ आघाडीने उत्तर प्रदेशात सर्वोत्तम कामगिरी केली. राहुल गांधींनी वायनाडमधून राजीनामा देण्याची घोषणा केली असली तरी हा निर्णय आधीच घेण्यात आला होता. त्यानंतर झालेली बैठक ही निव्वळ औपचारिकता होती. बैठकीत बहुतांश नेत्यांनी सांगितले की राहुल यांनी दक्षिण भारतात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मजबूत करण्याचे काम केले आहे. आता उत्तर भारत म्हणजेच एका अर्थी हदी पट्टा मजबूत करण्याची वेळ आहे. काँग्रेसला देशात एकहाती सरकार बनवायचे असेल तर ही हदी हृदयभूमी जकावी लागेल. त्यामुळे राहुल गांधी उत्तर भारताचे नेतृत्व करतील तर प्रियांका दक्षिण भारताचे नेतृत्व करतील, असा निर्णय पक्षाने घेतला. प्रियांका दक्षिणेत गेल्याने लोकांमध्ये काँग्रेसविषयी नाराजीही राहणार नाही. याशिवाय काँग्रेसची तेथील पकडही अबाधित राहण्यास मदत होईल.
गांधी घराण्याच्या आत्तापर्यंतच्या राजकारणावर नजर टाकली तर पक्षप्रमुखांनी नेहमीच अमेठी कवा रायबरेलीतून देशाचे राजकारण चालवल्याचे दिसते. या दोन्ही जागा कुटुंबासाठी शुभ मानल्या जातात. राहुल दोन ठिकाणांहून निवडून आल्याने कोणत्या जागेचा राजीनामा द्यायचा याबाबत त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असेल; परंतु पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधींनी राहुल यांना वायनाडपेक्षा रायबरेली का महत्त्वाची आहे, हे समजावून सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ऐंशी जागा असून या राज्यात काँग्रेसचा पाया मजबूत करायचा असेल तर रायबरेलीची खासदारकी महत्त्वाची आहे, हे त्यांचे म्हणणे राहुल गांधींना पटले. मोरारजी देसाई, नरेंद्र मोदी, एच. डी. देवेगौडा असे काही मोजके पंतप्रधान वगळले तर बहुतांश पंतप्रधान उत्तर प्रदेशातील होते. मोदी गुजरातचे असले तरी ते वाराणसीतून निवडून येतात. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर राहुल गांधींनी वायनाडचा राजीनामा का दिला, हे लक्षात येईल. सोनिया गांधींनी रायबरेलीच्या जनतेला ‌‘मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवत आहे‌’ असे म्हटले होते. त्यांचे ते भावनिक आवाहन अत्यंत परिणामकारक ठरले. राहुल यांना रायबरेलीमध्ये वायनाडपेक्षा मोठा विजय मिळाला. अशा परिस्थितीत रायबरेली सोडल्यास उत्तर प्रदेशमध्ये चुकीचा संदेश गेला असता.
इथे हेदेखील लक्षात घ्यायला हवे की, गांधी घराण्याच्या प्रमुखाने नेहमीच उत्तर प्रदेशमधून राजकारण केले. राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी अमेठीतून तर आजोबा जवाहरलाल नेहरू अलाहाबादमधून निवडणूक लढवत होते. रायबरेली ही त्यांची आई सोनिया, आजी इंदिरा गांधी आणि आजोबा फिरोज गांधी यांची जागा आहे. एकूणच देशाच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. उत्तर भारतातील हदी भाषिक बहुसंख्य राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 543 पैकी 350 जागा आहेत. 2019 मध्ये भाजपला येथे 170 पेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या आणि या पक्षाने तिथे एकहाती सरकार स्थापन केले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रात एकहाती सरकार बनवायचे असेल तर हदी भाषिक राज्यांमध्ये आणि विशेषत: उत्तर प्रदेशमध्ये पक्ष मजबूत बनवावा लागेल, हा काँग्रेसचा विचार असणे स्वाभाविक आहे, कारण आघाडीच्या बळावर जास्त काळ ते सत्तेवर राहू शकत नाही. या वेळी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला 9.4 टक्के मते मिळाली असल्यामुळे ही एक प्रकारे संजीवनीच म्हणावी लागेल, कारण 2019 मध्ये काँग्रेसला इथे फक्त 6.36 टक्के मते आणि एक जागा मिळाली होती. दुसरीकडे, 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 2.33 टक्के मते आणि दोन जागा मिळाल्या होत्या.
विरोधी पक्षनेता उत्तर प्रदेशचा असावा, अशी काँग्रेसजनांची इच्छा आहे. राहुल गांधींना संसदेत विरोधी पक्षनेते व्हावे लागेल; अन्यथा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू, असे खर्गे यांनी म्हटले होते. असे असले तरी राहुल गांधी ते मान्य करताना दिसत नाही. रायबरेलीची जागा कायम ठेवण्यामागील काँग्रेसची एक कल्पना अशीही आहे की विरोधी पक्षनेताही पंतप्रधान निवडून येणाऱ्या राज्याचाच असेल. यामुळे राहुल यांना राष्ट्रीय मीडिया आणि लोकांमध्ये राहण्याची अधिक संधी मिळेल. राहुल गांधी उत्तर प्रदेशमध्ये अधिक सक्रिय झाले तर मोदींशी अधिक स्पर्धा करू शकतील. उत्तर प्रदेशचे प्रश्न सभागृहात मांडू शकतील. यामुळे उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा जनसंपर्क आणखी वाढेल तसेच हदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेस मजबूत होईल. परिणामस्वरुप काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा एकदा नव्या ऊर्जेने आणि उत्साहाने जनतेमध्ये मिसळतील. इतकेच नाही, तर उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये काँग्रेस भाजपला पर्याय बनू शकेल.
प्रियांका समर्थकांनी राहुल गांधींनी वायनाड सोडू नये आणि प्रियांका गांधींना रायबरेलीतून पोटनिवडणूक लढवू द्यावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. परंतु प्रियांका गांधींनी ते मान्य केले नाही. नामांकनाच्या एक दिवस आधी राहुल रायबरेलीतून निवडणूक लढवणार, असे गांधी परिवाराने ठरवले होते. प्रियांका आणि त्यांचे पती रॉबर्ट या दोघांनाही रायबरेलीतून निवडणूक लढवण्याची इच्छा होती. पण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रियांका यांना घराणेशाहीच्या आरोपामुळे काँग्रेस कमकुवत होईल, असे सांगितले आणि संपूर्ण कुटुंबाने निवडणूक लढवण्याऐवजी राहुल गांधींना ब्रँड करणे आवश्यक असल्याचे पटवून दिले. त्यामुळेच प्रियांका गांधींनी वायनाड मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवण्याचे मान्य केले. वास्तविक, त्यांनी वाराणसीमध्ये मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवावी, अशी पक्षाची इच्छा होती. मात्र अखेरच्या क्षणी निर्णय बदलण्यात आला. राहुल यांनी रायबरेलीतील भाषणात याकडे लक्ष वेधले होते.
राहुल गांधी यांनी कन्याकुमारीतून ‌‘भारत जोडो‌’ यात्रेची सुरुवात केली. त्यानंतर दक्षिणेत काँग्रेस सातत्याने मजबूत होत गेली. विशेषतः केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये पक्षाला चांगला जनाश्रय लाभला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केरळमध्ये 20 पैकी 14 तर तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या. आता राहुल गांधींना हदी पट्टा मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे परंतु कोणत्याही कमतीत ते दक्षिण गमावू इच्छित नाहीत. त्यामुळेच राहुल गांधीच्या सांगण्यावरूनच प्रियांका गांधीनी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवण्यास होकार दिल्याचे सांगितले जाते.
प्रियांका गांधी संसदेत पोहोचल्याने काँग्रेसला ऊर्जा मिळेल, यात शंका नाही. आज काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते सभागृहाबाहेर पडले आहेत कवा त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशा स्थितीत प्रियांका यांच्या सभागृहात येण्याने पक्षाची विचारधारा अधिक मजबूत होणार आहे. त्या संसदेत पोहोचल्यावर सभागृहात नव्या काँग्रेसची झलक पहायला मिळणार आहे. थोडक्यात, त्यांचे संसदेत येणे हा मास्टर स्ट्रोक असेल. दुसरीकडे, आगामी काळात राहुल गांधींना उत्तर प्रदेशमध्ये आपले नेटवर्क वाढवायचे आहे. ते संपूर्ण राज्यात जनसंपर्क अभियान सुरू करू शकतात. काँग्रेसने निवडणूक लढवलेल्या जागांवर पदयात्रा काढू शकतात. येत्या काळात ते ग्राउंड वर्कवर भर देतील. यामुळे त्यांचा सार्वजनिक संपर्क आणि पक्षाचा पाठबा वाढेल. राहुल आणि प्रियांका उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा पाठबा वाढवण्यासोबतच अखिलेश यांच्याबरोबरच्या आघाडीची काळजी घेतील. ते अखिलेश यांना लोकसभेत राहुल त्यांच्या शेजारची जागा देऊ शकतात. सध्या समाजवादी पक्ष देशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. सहाजिकच राजकीय अवकाश व्यापताना मित्राचे अवकाश कमी होणार नाही, याची दक्षताही त्यांना घ्यावी लागेल.
(अद्वैत फीचर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *