भारत सरकार टांकसाळ, मुंबई यांच्याकडून

 

ठाणे  : मुंबई येथील भारत सरकारच्या टांकसाळीच्या सीएसआर फंडातून ठाणे महापालिकेस चार पोर्टेबल एक्स रे मशीन्स (क्ष किरण प्रतिमा यंत्र) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपलब्ध झाल्या आहेत. त्यापैकी दोन मशीन्स छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे तर उर्वरित दोन मशीन महापालिकेची आरोग्य केंद्रे व बाह्य रुग्ण तपासणी शिबिरांसाठी वापरण्यात येणार आहेत.
ठाणे महापालिकेस सीएसआर निधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे फेब्रुवारी २०२४ मध्ये मागणी नोंदवण्यात आली होती. त्यानुसार, सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत असलेल्या भारत सरकार टांकसाळ, मुंबई यांच्यातर्फे एक कोटी २१ लाख रुपये एवढा निधी उपलब्ध झाला. या निधीतून त्यांनी महापालिकेस चार पोर्टेबल एक्सरे मशीन उपलब्ध करून दिल्या. या मशीन्स नुकत्याच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दाखल झाल्या आहेत. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या निधी उपलब्धतेबद्दल भारत सरकार टांकसाळ यांचे आभार मानले असून या मशीन्समुळे रुग्णसेवेला फायदा होईल, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
महापालिकेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या बाह्य रुग्ण तपासणी शिबिरात एक्स रे त्वरित उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे, रुग्णाला मोफत एक्स रेसाठी महापालिकेच्या आरोग्य केंद्र किंवा पालिकेशी संलग्न असलेल्या खाजगी लॅबमध्ये जावे लागत होते. अशा स्थितीत सुमारे ५० टक्के रुग्ण आवश्यकता असूनही एक्स रे काढणे टाळत असत. या पोर्टेबल एक्स रे मशीन्समुळे रुग्णाचा एक्स रे त्वरित लॅपटॉपवर उपलब्ध होईल आणि त्याचा रिपोर्ट प्रिंट न करता रुग्णाच्या मोबाईलवर पाठवणे शक्य होईल. त्यामुळे रुग्णांचे त्वरित निदान करणे साेपे होणार आहे.
भारत सरकार टांकसाळ, मुंबई यांनी सीएसआर निधी उपलब्ध करून दिल्यामुळे हे पोर्टेबल एक्स रे मशीन उपलब्ध झाले आहेत. त्याचा फायदा आरोग्य शिबिरांनाही होणार आहे. त्यामुळे येत्या काळात अशी आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील. त्याचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *