मुंबई : राज्यातील 4 विधानपरिषद निवडणुकांसाठी आज मतदान पार पडले. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक पार पडत असून याच विधानपरिषदेच्या मतदानासाठी आज उद्धव ठाकरे यांनी कुटुंबीयांसोबत मतदान केले. यावेळी, उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनावर भाष्य करताना, त्यांनी खोके सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. त्यामुळे, राज्य सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असून यानंतर विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.
मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघात मतदान केले. त्यावेळी, माध्यमांशी बोलताना उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. ”उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन होत आहे, सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे.उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन असणार आहे. त्यामुळे, उद्या मी सर्व विषयावर बोलेन,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. दरम्यान, उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने विरोधकांन चहापानांचं निमंत्रण देण्यात आलं आहे. आज सायंकाळी सह्याद्री अतिथी गृहावर विरोधकांसाठी चहापान कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र, विरोधकांनी अघोषित परंपरेनुसार चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला असून आता विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरेंनीही महायुती सरकारमधील भाजप आणि शिंदेंविरुद्ध आक्रमक भूमिका घेत विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे.
शिवसेना आमदारांची बैठक, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन
शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची आज रात्री 8 वाजता बांद्रा ताज लँड हॉटेलला बैठक बोलवण्यात आली आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीपुर्वीचे हे शेवटचे अधिवेशन असल्यानं या अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाची काय रणनिती असणार यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. लोकांचे कोणते प्रश्न हाती घेवून आवाज उठवायचा याबद्दल उद्धव ठाकरे बैठकीत सर्वच आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते आणि दोन्ही सभागृहातील आमदार या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे समजते.

अधिवेशन सुरु होऊ द्या, कोण कोणाला निरोप देते हे समजेल- एकनाथ शिंदे
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अधिवेशनाला आपण उपस्थित राहणार असल्याचे म्हटले होते. तसेच या सरकारते हे निरोपाचे अधिवेशन असल्याचा टोलाही त्यांनी लगावला होता. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. त्यासाठी आधी त्यांनी अधिवेशनात हजेरी तर लावावी मग कळेल कोण कोणाला निरोप देतेय ते अशा शब्दात शिंदे यांनी टोला लगावला.
