वाचक मनोगत
लोकसभेच्या निकालानंतर नवनिर्वाचित खासदार जेव्हा संसदेत पहिल्यांदा एकत्र येतात तेव्हा त्यांना खासदारकीची शपथ दिली जाते. हा शपथविधीसुद्धा मनोरंजक असतो. या शपथविधीच्या कार्यक्रमात खासदारांच्या विविध छटा पाहायला मिळतात. खासदारांपैकी कोणी इंग्रजीत तर कोणी हिंदीत तर कोणी संस्कृत भाषेतही शपथ घेतात. अनेक खासदार संसदेत कोणाला समजो वा न समजो आपल्या मातृभाषेतुन शपथ घेतात. यंदाही आपल्या मातृभाषेत शपथ घेणाऱ्या खासदारांचे प्रमाण लक्षणीय होते. एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उर्दू भाषेत शपथ घेताना शेवटी ‘जय भीम -जय भीम’, ‘अल्लाहू अकबर’ आणि ‘जय पॅलेस्टाईन’ अशा घोषणा दिल्या. पॅलेस्टाईन आणि इस्राईल यांच्यातील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. पॅलेस्टाईनने पोसलेल्या आतंकवादाला इस्त्राईल देशाने जशास तसे उत्तर दिल्याने आतंकवादाने पीडित असलेल्या समस्त देशांनी इस्त्राईलला पाठिंबा दिला आहे ज्यामध्ये भारत सुद्धा आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १०२ ‘ड’ नुसार संसदेतील कोणत्याही सदस्याने अन्य कोणत्याही देशाला समर्थन देणे अवैध आहे. अशाने त्या संशयाचे सदस्यत्व रहित होऊ शकते. भारतीय संसदेत शपथ घेतांना अन्य देशांशी निष्ठा ठेवणे, हा देशद्रोह आहे, तसेच हा भारताचा अपमानही आहे. त्यामुळे सध्या गोव्यात सुरु असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात असदुद्दीन ओवैसी यांचा तीव्र निषेध व्यक्त करून लोकसभेचे अध्यक्ष आणि केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री यांच्याकडे असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करण्याची मागणी करण्याचा ठराव करण्यात आला. ज्याला उपस्थित सर्वांनीच अनुमोदन दिले.
‘हमास’ या कट्टर पॅलेस्टिनी गटाने इस्रायलवर आतंकी हमला करून इस्राईलमध्ये हाहाकार उडवला होता. इस्त्राईलच्या महिला सैनिकांना, लहान मुलांना ओलीस ठेवले, कोवळ्या मुलांचे त्यांच्या पालकांसमोर शिरच्छेद केले, महिला सैनिकांची नग्न धिंड काढली, त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले, इस्त्राईलच्या नागरिकांना हालहाल करून ठार केले. त्याच्या प्रत्युत्तरादाखल इस्त्राईलने हमासच्या ताब्यात असलेल्या गाझा पट्टीवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. आतंकवाद्यांना पोसणाऱ्या पॅलेस्टिनींचे सुद्धा यामध्ये नुकसान झाले. इस्त्राईलने जोरदार प्रत्युत्तर दिल्यावर इस्त्राईल कसा मानवतावादाला विसरला आहे, पॅलेस्टीनी महिलांचे, नागरिकांचे कसे हाल होत आहेत, त्यांच्यावर कसा अन्याय होत आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या माध्यमांत पेरल्या गेल्या, युद्धातील छायाचित्रे माध्यमांवर झळकावण्यात आली या सर्वातून लोकांच्या भावना मिळवण्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्राईलविषयी रोष पसरवण्याचा प्रयत्न पॅलेस्टाईन कडून केला जात आहे. मात्र ही सर्व आपल्याच कर्माची फळे आहेत याची जाणीव पॅलेस्टाईनला केव्हा होणार ? पॅलेस्टाईनमध्ये मुस्लिमांची संख्या अधिक असल्याने भारतासह जगभरातील मुस्लिम पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. भारतातही अनेक ठिकाणी यांनी निदर्शने केली. पॅलेस्टाईनने आजतागायत पोसलेल्या आतंकवादाच्या विरोधात किंवा हमसने इस्त्राईली नागरिकांचा, महिलांचा आणि कोवळ्या मुलांच्या केलेल्या छळाबाबत मात्र यापैकी कुणीच ब्र काढायला मागत नाही. आतंकवाद ही आज जगासमोरील मोठी समस्त बनली आहे. महासत्ता म्हणवून घेणारे देशही आतंकवादासमोर हतबल झाले आहेत असे असताना आतंकवादाविरोधात लढणाऱ्या इस्त्राईलच्या बाजूने उभे राहण्याची आवश्यकता असताना आतंकवाद पोसणाऱ्या देशाचा एका खासदाराने संसदेत जयघोष करणे नक्कीच निषेधार्ह आहे. पॅलेस्टाईनचा जयजयकार करणाऱ्यांना आज थांबवले नाही तर भविष्यात ‘जय हमास’, ‘जय पाकिस्तान’ यासारख्या घोषणाही संसदेत ऐकायला मिळतील त्यामुळे असदुद्दीन ओवैसी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देशभरातून करण्यात येत आहे. असदुद्दीन ओवैसी हे वादग्रस्त विधानासाठी नेहमीच चर्चेत असतात. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी वाद ओढवून घेतल्याने संसद त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सौ. मोक्षदा घाणेकर,
काळाचौकी, मुंबई