मुरबाड : धसईनजीकच्या ओजिवले येथील कातकरीवाडीपर्यंत पोचण्यासाठी रस्ता तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, अशी मागणी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे आज केली आहे. कातकरीवाडीतील महिलेला प्रसूतीसाठी झोळीतून आणले जात असल्याच्या वृत्ताची तातडीने दखल घेत, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याबरोबर संपर्क साधला. तसेच या वाडीपर्यंत जिल्हा नियोजन विकास निधी किंवा जिल्हा परिषदेच्या निधीतून रस्ता तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची मागणी केली.
मुरबाड तालुक्यातील ओजिवली येथील कातकरीवाडीमध्ये ५० हून अधिक नागरिक राहतात. मुख्य गावापासून एक किलोमीटरवर असलेल्या या वाडीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे एका गरोदर महिलेला प्रसूतीसाठी बांबूला बांधलेल्या कपड्याच्या झोळीतून रुग्णालयात आणले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी तातडीने दखल घेतली.
जिल्हा नियोजन समिती वा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कातकरीवाडीमध्ये जाण्यासाठी डांबरी रस्त्याला मंजुरी द्यावी, या संदर्भात तातडीने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने प्रस्ताव तयार करावा, अशी विनंती कपिल पाटील यांनी केली.
000000