कुस्ती जगतावर शोककळा
सांगली : कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान सुरज निकमने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. त्याच्या आत्महत्येमुळे कुस्ती जगतावर शोककळा पसरली आहे. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत. कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करुन आस्मान दाखवणाऱ्या सूरजने अशा पद्धतीने आयुष्याचा शेवट केल्याने हळहळ व्यक्त होते आहे.
सूरज निकमचा दीड महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. त्याच्या पश्चात त्याची आई, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सूरजने गळफास घेतल्याचं त्याच्या नातेवाईकांना समजलं. त्याचे मामा भास्कर जोतीराम जाधव यांनी सूरजला रुग्णालयात आणलं होतं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. कुस्ती क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारा हा मल्ल काळाच्या पडद्याआड गेला आहे. गेल्या वर्षी झालेल्या कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकत मानाची गदा पटकवली होती.
पैलवान सूरज निकम हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातल्या नागेवाडी गावातील रहिवासी आहे. त्याने कुस्तीच्या आखाड्यात भीम पराक्रम केला आहे. कुमार महाराष्ट्र केसरी हा किताबही त्याने जिंकला. विरोधी पैलवानाला कोणत्या डावावर चितपट करायचे यात त्याचा हातखंडा होता. त्याने अल्पावधीतच आपला कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण करत कुमार केसरी होण्याचा बहुमान मिळवलेला होता. या सूरजने आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेमुळे कुस्ती क्षेत्रासह खानापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
त्याच्या वडिलांचं निधन झाल्याने तो व्यथित झाला होता. शुक्रवारी म्हणजेच आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास लावून घेतला आणि आयुष्य संपवलं. सूरजच्या निधनाचं वृत्त समजताच कुस्ती क्षेत्रासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सूरजच्या निधनानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. शनिवारी दुपारी त्याचे बंधू आल्यानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती आहे. पैलवान सूरजच्या आत्महत्येचं कारण काय? ते समजू शकलेलं नाही. पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.