माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांची टीका
मुंबई :- आजचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
अर्थसंकल्पावर सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकांचा चांगलाच परिणाम राज्यात झालेला दिसतोय.आता पराभव समोर दिसत असताना,या अर्थसंकल्पातून शेवटचा प्रयत्न महायुती सरकारने केला आहे. हा प्रयत्न देखील तीन महिन्यांसाठी आहे. अगदी बेजबाबदारपणे मांडलेले हे बजेट आहे असे ते म्हणाले.
महिला व बालकल्याण विभागासाठी असलेल्या बजेट पेक्षा ४६ हजार कोटींचे अधिकची प्रोव्हिजन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली आहे. मागच्या वर्षी १ लाख ३० कोटी महसुली तुटीच्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या. आता मात्र महसुली तूट २० हजार कोटींची दाखवली. ही सगळी आकडेवारीची जग्लरी आहे.
निवडणुकीच्या आधी पेट्रोल डिझेलचे भाव कमी करायचे नंतर वाढवायचे ही पंतप्रधान मोदींची पद्धत राज्यात राबवली गेली आहे. निवडणुका झाल्या की पुन्हा दर वाढविले जातील असे सांगत राज्यातील महिलांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहात तो सक्षमपणे करा. फक्त घोषणा करून ठराविक वर्गाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.अशी टिका त्यांनी केली.
एमएससीबीची मागची थकबाकी माफ करणं अपेक्षित असताना पुढची सुपारी घेणं हे जबाबदारपणाचे लक्षण नाही. म्हणून मी वारंवार सांगतोय की, हे बजेट फक्त दोन महिन्यांचे आहे. हे सत्तेतून बाजूला गेल्यानंतर, आम्ही ज्यावेळी सत्तेत येऊ तेव्हा आम्ही जबाबदारीने महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देण्याचा काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुकोबारायांनी वारीसाठी नाजरणा पाठवला होता. त्यावेळी तुकाराम महाराजांनी त्यास स्पर्श न करता तो परत पाठवला. आणि त्यांचे आभार मानले. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून निघणाऱ्या दिंड्यांना मोठी परंपरा आहे. उत्स्फूर्तपणे लोकं वारी प्रतिसाद देतात. त्याला राजकारणासाठी जोडणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिंड्यांना दिलेल्या अनुदानावर दिली.
